निकेत पावसकर -- नांदगाव -महाडजवळ सावित्री नदीवरील घडलेल्या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटीशकालीन तसेच आयुर्मर्यादा संपलेल्या पुलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच महामार्गावर ७५ वर्षांपुर्वी उभारलेला पियाळी नदीवरील नांदगाव पूल व ५५ वर्षांपूर्वीचा बेळणे नदीवरील बेळणे पूल असून हे दोन्ही पूल वाहतूकीस धोकादायक बनले आहेत. सावित्रीच्या घटनेनंतर प्रशासन जागे होऊन या पुलांचे काम होईल का? असा प्रश्न वाहन चालक व परिसरातील नागरिक विचारीत आहेत. या महामार्गावर १९६१ साली बांधलेला बेळणे पूल तर १९४१ साली बांधलेला नांदगाव पूल आहे. दोन्ही पुलांची सद्यस्थिती अत्यंत बिकट झाली असून ते वाहतूकीस धोकादायक बनले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित विभागांकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या पडताळणीमध्ये हे दोन्ही पूल सुस्थितीत असल्याचा अहवाल मिळत आला आहे. दरवर्षी कोकणात पडणारा प्रचंड पाऊस आणि या महामार्गावरून अतिअवजड वाहनांची अहोरात्र सुरू असणारी वाहतूक यामुळे हे पूल किती वर्ष तग धरून राहतील. याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. असे पूल बांधताना त्यांची आयुर्मर्यादा निश्चित केलेली नसते. मात्र दरवर्षी पावसाळ्यापूर्वी व पावसानंतर बांधकामाचे निरिक्षण होते. या निरिक्षणात बांधकाम पाहिले जाते. पूल व्हायब्रेट होतो का? आणि अवजड वाहने जाताना पूल हादरतो का? याची पाहणी केली जाते. त्यानुसार हे पूल सुस्थितीत असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे, असे महामार्ग प्राधिकरण सावंतवाडी व रत्नागिरी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. या दोन्ही पुलांची आणि रस्त्याची सद्यस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पुलावर पाणी साचून राहते. पियाळी नदी मोठी असल्याने येथे सर्वाधिक धोका संभवतो. अनेकदा या पुलाचे संरक्षक कठडे तुटून पडतात. अशावेळी अधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष जात नाही. एखादी दुदैवी घटना घडल्यास या अधिकाऱ्यांना जाग येते. विशेष म्हणजे या संरक्षक कठड्यांना दरवर्षी रंगरंगोटी करण्याखेरीज इतर कोणतेच काम संबंधित विभागाकडून होताना दिसत नाही. महाडच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील बिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याची घोषणा केली आहे. अश प्रकरणात केवळ आॅडीट न करता दोन्ही पुलांना पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. अन्यथा चौपदरीकरणाच्या नावाखाली याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. बेळणे आणि नांदगाव पुलाबाबत अजून किती प्रतिक्षा करायची असा प्रश्न विचारला जात आहे. या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातही काही पुलांचे काम अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. मात्र या पुलाला पर्यायी व्यवस्था किंवा पर्यायी पूल अद्याप उभारले नाहीत. चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागणार आहे. महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवावेतबेळणे पुलासह नांदगाव पुलावर व या परिसरात पडलेले खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी नांदगाव-बेळणे परिसरातील ग्रामस्थांसह वाहनचालकांकडून होत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी कोकणात मोठ्या प्रमाणावर भाविक विविध भागातून येत असतात. त्यावेळी कोणतीही दुदैवी घटना घडू नये यासाठी खड्डे बुजवावेत या मागणीने जोर धरला आहे.
बेळणे, नांदगाव पूल धोकादायक
By admin | Published: August 05, 2016 11:37 PM