कणकवली : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध कणकवलीतील काही नागरिकांनी केला आहे. देशवासीय आणि सावरकरप्रेमींच्या भावना दुखावल्याने राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करीत या नागरिकांनी प्रातांधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन दिले.यावेळी अॅड. राहुल तांबोळकर, अखिल आजगावकर, सुरेश देसाई, देवदास करांडे, चेतन पेडणेकर, समीर प्रभुमिराशी, गिरीश चव्हाण, विघ्नेश गोखले, हणमंत इंगळे, कृष्णा बाक्रे, सुनील बाक्रे आदी नागरिक उपस्थित होते.यावेळी प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, देशातील संवेदनशील अशा बलात्काराच्या घटनांबाबत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी १३ डिसेंबर रोजी झारखंड येथील जाहीर सभेमध्ये केलेल्या बेताल वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.
भारतामध्ये सध्या महिलांच्याबाबत घडत असलेल्या घटना या अतिशय निंदनीय असून त्या घटनांचे राजकीय भांडवल न करता त्यावर उपाययोजना करण्याची गरज असताना राहुल गांधींसारखे स्वत:ला जबाबदार म्हणणारे नेते स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी या घटनांचा वापर करून अतिशय निंदनीय वक्तव्य जाहीरपणे करीत आहेत.भारतासारख्या महान सांस्कृतिक वारसा असणाºया देशामध्ये बलात्काराच्या घटनांबाबत जाहीरपणे बोलताना रेप इन इंडिया असे संबोधून त्यांनी सर्व भारतीयांचा व प्रामुख्याने देशातील माता भगिनींचा अपमान केला आहे.एवढ्यावरच न थांबता आपल्या चुकीच्या वक्तव्याचे समर्थन करताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयीदेखील अशोभनीय आणि अपमानजनक उद्गार त्यांनी काढले. तसेच माफी मागायला मी राहुल सावरकर नाही असे बोलून आपल्या असंस्कृत व उद्दामपणाचे जाहीर प्रदर्शन त्यांनी दिल्ली येथे जाहीर सभेत बोलताना केले.देशाचे सुजाण नागरिक म्हणून आम्ही त्यांच्या या निंदनीय व असंस्कृत, अशोभनीय अशा वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. या वक्तव्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी. अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.