कणकवली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अनुद्गार काढणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची तत्काळ माफी मागावी. त्यांनी दोन दिवसांत माफी न मागितल्यास आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू . असा इशारा भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे यांनी दिला आहे.कणकवली येथिल भाजपा संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजप प्रभारी तालुकाध्यक्ष राजन चिके, महिला प्रदेश सदस्या प्रज्ञा ढवण, माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष रमेश पावसकर, डामरे माजी सरपंच बबलू सावंत, परशुराम झगडे, पपू पुजारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी राजश्री धुमाळे म्हणाल्या , स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही कदापिही सहन करणार नाही.सावरकरांविरोधात बोलणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांनी प्रथम देशाचा इतिहास जाणून घ्यावा आणि त्यानंतरच वक्तव्य करावे. त्यांचे ते वक्तव्य बलिशपणाचे आहे. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबरच संपूर्ण देशाचाही अपमान केला आहे. हे कधीही सहन केले जाणार नाही. असेही राजश्री धुमाळे यांनी यावेळी सांगितले.यावेळी राजन चिके म्हणाले, १८ डिसेंबर रोजी कणकवली तालुका भाजपाचा मेळावा भगवती मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता होणार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच तालुक्यातील विकासकामांचा आढावा ते यावेळी घेणार आहेत. त्याचबरोबर पुढील काळात सक्षम विरोधी पक्ष या नात्याने काम करण्याविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार , माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपा प्रदेश सदस्य अतुल काळसेकर, प्रदेश सचिव राजन तेली, जिल्हापरिषद अध्यक्षा संजना सावंत यांची प्रमुख उपस्थितीही असणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले.नूतन तालुकाध्यक्ष पक्षश्रेष्ठी ठरवतील !सध्या भाजपाची जिल्ह्यातील पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार नूतन तालुकाध्यक्ष कोण असणार? हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. पक्षश्रेष्ठी आपल्यावर जी काही जबाबदारी देतील ती पार पाडली जाईल.भाजपात पक्ष शिस्त महत्वाची असते. त्यामुळे पक्ष वाढविण्यासाठी नवे ,जुने असा वाद न करता सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने प्रयत्न करतील . असे एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान राजन चिके यांनी सांगितले.