कणकवली : नांदगाव पंचक्रोशीतील सर्वांना जवळ असलेले नांदगाव रोड रेल्वे स्टेशन येथे तुतारी रेल्वेला थांबा मिळण्यासाठी ४ मार्च रोजी रेल रोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु तूर्तास ते आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.अशी माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे वाघेरीचे माजी सरपंच संतोष राणे यांनी दिली. केंद्रिय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या प्रश्नाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच फोन द्वारे चर्चा देखील केली आहे. नांदगाव दशक्रोशी मधील ग्रामस्थांच्या मागणीची तातडीने दखल घेत आठ दिवसात याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी नारायण राणे यांना दिले आहे. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे संतोष राणे यांनी सांगितले. नांदगांव रेल्वे स्टेशन या ठिकाणी मागील कोरोना काळापासून तुतारी रेल्वेला थांबा बंद केलेला आहे. वारंवार संबंधित विभागांना व मंत्री यांना विनंती करूनही अद्यापपर्यंत रेल्वे थांब्यासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी रेल रोको करण्याकरिता नियोजन बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत रेल रोकोसाठी दिवस निश्चित करण्यात आला. व त्यानुसार नियोजन पूर्ण झाले होते अशी माहिती वाघेरी माजी सरपंच संतोष राणे यांनी दिली. दरम्यान, या मागणीची नारायण राणे यांनी दखल घेतल्याने तूर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र, याबाबत येत्या पंधरा दिवसात कार्यवाही न झाल्यास पुन्हा संबंधित प्रशासनाला निवेदन देत आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील संतोष राणे व प्रवासी संघटनेच्यावतीने यांनी दिला आहे.
नांदगाव स्टेशनवरील 'रेल रोको आंदोलन' तुर्तास स्थगित!, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची रेल्वे मंत्र्यांशी चर्चा
By सुधीर राणे | Published: March 04, 2023 6:22 PM