राजापूर : याआधी युपीए सरकारच्या कार्यकाळात रेल्वे अर्थसंकल्पात सुतोवाच करण्यात आलेल्या कोल्हापूर-राजापूर या नवीन मार्गाला सुरेश प्रभूंच्या रेल्वेमंत्रिपदाचा फायदा होण्याची आशा निर्माण झाली आहे. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला गेला तर प्रत्यक्षात हा मार्ग अस्तित्त्वात यायला वेळ लागणार नाही. या नवीन मार्गामुळे कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र) व राजापूर (कोकण) यांच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर व किफायतशीर असाच प्रवास लाभणार आहे.दळणवळणाच्या दृष्टीने कोकण रेल्वे व पश्चिम महाराष्ट्राशी संबंधित विशेषत: कोल्हापूर या जिल्ह्याला जोडणारा अद्याप तरी मार्ग नाही. त्या पार्श्वभूमीवर राजापूर-कोल्हापूर अशा नवीन मार्गाची घोषणा चार-पाच वर्षापूर्वी झालेल्या रेल्वेच्या अर्थसंल्पनात करण्यात आली होती आणि त्यानंतर राजापूरवासियांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर काहीच हालचाल न झाल्याने शासनाची आणि पर्यायाने तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा पोकळ ठरली होती. अधूनमधून या मागणीचा पुनरुच्चार झाला. मात्र त्यादृष्टीने प्रयत्न झाले नाहीत. मागणीचा रेटा लावण्यासाठी एकजूट नसल्याने हा प्रश्न अजूनही जैसे थेच आहे.या नियोजित मार्गाचे सर्वेक्षण सुरु आहे, अशीही उत्तरे दिली गेली. तथापि हा मार्ग नक्की कुठून असेल ते आजतागायत स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे निर्माण झालेली संभ्रमावस्था कायम राहिली आहे. दरम्यान कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर -चिपळूण अशा नवीन रेल्वे मार्गाबाबतही अधूनमधून काही ना काही माहिती पुढे येत आहे. त्यामुळे कोल्हापूर-राजापूर असा मार्ग होणार की, चिपळूण-कोल्हापूर असा मार्ग होणार, हा प्रश्न अजून कायम आहे.याआधी संसदेत राजापूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व केलेल्या सुरेश प्रभूंसारख्या अभ्यासू व्यक्तींकडे आता रेल्वे खात्याचे मंत्रीपद असल्याने राजापूर-कोल्हापूर मार्गाच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा राजापूरकर व्यक्त करत आहेत.पश्चिम महाराष्ट्राशी नाते जोडणारा असा हा नियोजित मार्ग ठरु शकेल. बाजारपेठ म्हणून कोल्हापूर हे कोकणासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे कोल्हापूर-राजापूर रेल्वेमार्ग झाला तर भविष्यात राजापूरचे महत्वही वाढेल. त्यामुळे हा मार्ग व्हावा आणि त्यासाठी राजापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यासाठी सर्वसामान्यांच्या मागणीला महत्त्व येणार आहे. जर ही मागणी पूर्ण झाली तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांचं व्यापारी नातं तयार होणार आहे.(प्रतिनिधी)
रेल्वेमार्गासाठी प्रयत्न अन् एकजूट हवी
By admin | Published: December 17, 2014 9:37 PM