कणकवली : कोकण रेल्वेमार्गात विघ्न आले असताना पावसानेही गेल्या २४ तासांत संततधार लावल्याने गणेशभक्तांना बेजार करून सोडले. या पावसाने जिल्ह्यात पडझडीच्या घटना घडल्या असून, हवामान खात्याकडून येत्या ७२ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.गेले दोन दिवस पावसाने जिल्ह्यात जोर धरला आहे. पावसाने पडझड होऊन घरांचे नुकसान झाले आहे. कुडाळ तालुक्यातील मनोरमा मनोहर दळवी यांच्या घराच्या पडवीचे अंशत: नुकसान झाले असून, सावंतवाडी तालुक्यातील प्रदीप भिकाजी नाईक यांच्या घराचे ५७०० रुपयांचे, तर विलवडे येथील बाळकृष्ण वासुदेव दळवी यांच्या घराचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यातील संदेश आत्माराम ठाकूर यांच्या घरावर फणसाचे झाड पडून १० हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले. देवगड, जामसंडे केळकर महाविद्यालयाच्या मार्गावर पावसाचे पाणी तुंबले होते. समुद्रात लाटा उसळत आहेत. मच्छिमारही वाऱ्यामुळे परत आले आहेत. विस्कळीत झालेली कोकण रेल्वे अद्याप ‘ट्रॅक’वर आलेली नाही. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या जादा गाड्या अर्धा-पाऊण तास उशिराने धावत होत्या. मुंबईहून येणारी दिवा पॅसेंजर रद्द करण्यात आली होती. आज, बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईकडे जाणारी ‘मांडवी’ सकाळी सहा वाजेपर्यंत कणकवली स्थानकात अपेक्षित होती. मुंबईकडे जाणारी ‘शताब्दी’ ४० मिनिटे उशिराने कणकवलीत आली. (प्रतिनिधी)
रेल्वे विस्कळीत, त्यात पावसाची धार
By admin | Published: August 27, 2014 10:44 PM