कुडाळ : कुडाळ रेल्वेस्थानकातील बोगस तिकीट विक्री व्यवहाराला एकटा एजंट जबाबदार नसून कुडाळ रेल्वेस्थानकामधील कोकण रेल्वेचे काही कर्मचारी वर्ग व एजंट यांच्या संगनमताने हा राजरोसपणे खुले व्यवहार होत असल्याचा आरोप कुडाळ तालुका राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला आहे. संबंधित बोगस तिकीट विक्री करणाऱ्या एजंटवर तत्काळ कारवाई करा, अन्यथा पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा कुडाळ तालुका राष्ट्रवादीने शुक्रवारी निवेदनातून कुडाळ पोलीस निरीक्षक यांना दिला आहे. चार-पाच दिवसांपूर्वी कुडाळ रेल्वेस्थानकावर काही प्रवाशांना बोगस तिकिटांची विक्री करण्यात आली होती. यासंदर्भात यापूर्वीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठविला होता. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यामुळे पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, अमित सामंत, दादा बेळणेकर, बाळ कनयाळकर, भास्कर परब, साबा पाटकर, सी. व्ही. पाताडे, आत्माराम ओटवणेकर, राजेश पाताडे आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, बोगस तिकिटांची विक्री कुडाळ रेल्वेस्थानक परिसरात होत आहे. यासंदर्भात आम्ही अगोदरच उठविला होता. बोगस तिकिटांची विक्रीचा व्यवहार एजंट आणि कुडाळ रेल्वेस्थानकाचे काही कर्मचारी यांच्या संगनमताने होत आहे. कुडाळ रेल्वेस्थानक एजंटमुक्त व्हावे, याकरिता वेळोवेळी आवाज उठविण्यात आला. मात्र, स्थानक अजूनही एजंटमुक्त झालेले नाही. एजंट आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचे साटेलोटे बंद न झाल्यास पूर्व सूचना न देता कुडाळ तालुका राष्ट्रवादीच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा कुडाळचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. (प्रतिनिधी)
रेल्वे कर्मचारी बोगस तिकीट विक्रीत
By admin | Published: February 20, 2015 10:12 PM