कनेडी (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात कणकवली तालुक्यातील कनेडी आणि परिसरात आज, शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटात जोरदार वादळी वळीव पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांची पळापळ सुरू झाली.दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवार (दि.६) पासूनच पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. गेले दोन दिवस वातावरणात उकाडा वाढल्याने ग्रामस्थ हैराण झाले होते. आज, शुक्रवारी सायंकाळी साडेतीनच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही वेळातच सोसाट्याच्या वाऱ्यासोबत पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पाऊस सुरू होता.शेतकऱ्यांच्या बेगमीसह आंब्याचे मोठे नुकसानशेतकऱ्यांनी बेगमी करून ठेवलेली लाकडे, शेणी, गुरांचा चारा, पावसाने भिजून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांची पळापळ होत असलेली दिसत होती. शेतकऱ्यांच्या कलमी आंब्याचेही मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे आंबे खाली पडून ढीग झाला होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठिकठिकाणी वीज वितरणच्या तारा तुटून वीज प्रवाह बंद झाला होता तर काही ठिकाणी मार्गही झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडून बंद झाले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात वाऱ्यासह पाऊस, आंब्याचे मोठे नुकसान
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 07, 2023 6:57 PM