सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मागील आठवडाभर पावसाची असलेली संततधार सोमवारी ओसरली. पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले; मात्र मागील आठवडाभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तर गतवर्षीच आजपर्यंतची सरासरी ओलांडून पावसाने ओव्हरटेक केली आहे. हवामान विभागाने दिलेला ऑरेंज अलर्ट मात्र कायम आहे.जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ११९.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ८३.२ मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी १८८०.८ मि.मी. पाऊस झाला आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये ३८९.५९५ द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ८७.0९ टक्के भरले आहे.जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये सरासरी ७० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे.
नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीजवळतिलारी नदीची पाणीपातळी ४०.७० मीटर, कर्ली नदीची पातळी ८.५०० मीटर, वाघोटन नदीची पाणी पातळी ६.४०० मीटर, गडनदीची पातळी ३५.५०० मीटर, तेरेखोल नदीची पाणी पातळी ४.२०० मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.