लोकमत न्यूज नेटवर्ककणकवली, सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दाणादाण उडविली आहे. मंगळवारी रात्रीपासून अखंड सुरू असलेला पाऊस बुधवारीही दिवसभर पडत राहिल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. रस्त्यावर काही झाडे उन्मळून पडल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती, तर कणकवली तालुक्यात विजेची उपकरणे जळण्याबरोबरच विविध ठिकाणच्या घटनेत २ लाखांचे नुकसान झाले आहे. सह्याद्री पट्ट्यासह जिल्ह्याच्या सर्वच भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांची पाण्याची ‘साखळी’ तुटली आहे. त्यामुळे नद्या प्रवाहित झाल्या आहेत. तसेच वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीजवितरणची ‘बत्ती गुल’ झाली आहे. कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागाला वीजपुरवठा करणाऱ्या १३२ केव्हीच्या खारेपाटण फिडरमध्ये बिघाड झाल्याने वीजप्रवाह खंडित झाला आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून तालुक्यातील काही ग्रामीण भाग अंधारात आहे. बुधवारी दुपारी बारा वाजले तरीही वीजपुरवठा सुरळीत करण्यात वीजवितरणला यश आले नव्हते.कणकवली शहरातील वीजप्रवाहही अधूनमधून खंडित होत होता.जोरदार पावसाने कणकवली शहरातील तेली आळी येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. अन्य ठिकाणीही सखल भागात पाणी साचले होते. गटारे, नाले तुडुंब भरून वाहात होते.वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने नागवे रस्त्यावर एक वृक्ष उन्मळून पडला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने हे झाड बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. जानवली येथेही छोटे झाड रस्त्यावर पडले होते. ओहोळ तसेच नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने काही तरुणांनी पावसाचा आनंद लुटत मासेमारीही केली.
पावसाने जिल्ह्यात दाणादाण
By admin | Published: May 31, 2017 11:30 PM