कडावल (सिंधुदुर्ग) : गणेशोत्सवानंतर आता भक्तांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. दुर्गामातेच्या स्वागतासाठी आणि गरबा, दांडिया नृत्यासाठी उत्सुकता असली तरी या उत्सवावर पावसाचे सावट असल्याने आयोजक व नृत्यप्रेमी चिंतेत आहेत.काही वर्षांपूर्वी मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरापुरता सिमित असलेला नवरात्रोत्सव आता खेड्यापाड्यातही पोहोचला आहे. गावोगावी आता नवरात्रोत्सव मंडळे स्थापन झाली आहेत व होत आहेत. दुर्गामातेच्या मूर्तीची स्थापना करून तिची भक्तिभावाने पूजा केली जात आहे. तसेच या उत्सवाच्या अनुषंगाने खेड्यापाड्यांमध्येही दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात येत आहे.गणेशोत्सवाची धामधूम संपली आहे. म्हाळवसही संपत आल्याने आता सर्वांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. गावोगावची मंडळे व उत्सवप्रेमी नागरिक यासाठी सक्रिय झाले आहेत.दुर्गामातेची सुबक मूर्ती बनविण्यापासून इतर सर्वच कामांसाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग उडत आहे. मात्र, अद्याप पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही.
परिसरातील वातावरण अनेकदा ढगाळ असते. काहीवेळा पाऊसही पडत आहे. तसेच कोकणात आणखी काही दिवस पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला असल्याने या उत्सवावर पावसाचे सावट आहे.