सिंधुदुर्ग, दि. 19 -सिंधुदुर्गात जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव-आंबेरी पुलावर मंगळावारी सकाळपासून पावसाचे पाणी आल्यानं माणगाव खोर्यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनाही या पाण्यामुळे खोळंबून राहावे लागले आहे. मंगळवारी माणगावचा आठवड्याचा बाजार असल्यामुळे तुफान पावसाचा अनेकांना फटका बसला आहे.हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू आहे. पावसामुळे नदीकाठावर असणा-या गावातील लोकांची पळापळ झाली आहे. कुडाळ-आंबेडकर नगरमध्ये पुराचे पाणी शिरले असून काळसे बागवाडी पाण्याखाली गेली आहे. मालवण तालुक्यातील बागायत, मसुरे-कावा भागात पूरजन्य परिस्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक अंतर्गत मार्ग ठप्प झाले आहेत.
रत्नागिरी व रायगडला अतिवृष्टीचा इशारा
दरम्यान, कोकणातील कुडाळ, मालवण, कणकवली, रत्नागिरी, लांजा येथे अतिवृष्टी झाली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़ येत्या २४ तासात कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याला सलग दुस-या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. कुडाळ, मालवण आणि कणकवली तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. कोकण किनारपट्टीवर ताशी ४५ ते ५० किमीच्या वेगाने वारे वाहनार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना त्यांना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.