वेंगुर्ले, कणकवली : कोकणवासीयांचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश चतुर्थी सणासाठी सध्या सर्वत्र लगबग सुरू आहे. हारतुरे, रोषणाई, मिठाई, फटाके, फळे यांची दुकाने सजली आहेत. परंतु बुधवारी सकाळपासूनच पाऊस पडत असल्याने शहरात सामानखरेदीसाठी गर्दी कमी होती. जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये आणि शहरांमध्ये अशी स्थिती होती.माटवीसाठी लागणारे साहित्य, ग्रामीण भागातील भाजी आज सकाळपासून बाजारात विक्रीला आली होती. बाजारात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी चारचाकी वाहनांना बाजारपेठेतील रस्त्यावरून बंदी करण्यात आली आहे. भजनासाठी लागणाऱ्या वाद्याच्या कारागिरांना या महिन्यात चांगली मागणी असते. स्थानिकांबरोबरच सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर आदी भागातून हे कारागीर या महिन्यात कोकणात हजेरी लावतात. गणेशमूर्ती शाळांमध्ये मूर्तिकार गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरविताना दिसत आहेत. वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याबाबत मूर्तिकारांतून नाराजी व्यक्त होत आहे. शहरात प्लास्टिक व कागदी हार, मिठाई, फटाके, अगरबत्ती, फळे, अगरबत्ती यांची दुकाने सजली आहेत. जनजीवन विस्कळीतसावंतवाडी : तालुक्याभरात आज बुधवारी दिवसभर पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत करुन टाकले. गणेश चतुर्थी असतानाही बाजारपेठ व रस्तेही मोकळेच दिसत होते. यामुळे गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण टाकण्याचे काम या संततधार पावसाने केले आहे.सावंतवाडी तालुक्यात दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे कोणतीही नुकसानी झालेली नाही. तालुक्यात दिवसभरात ४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण २६२0 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. मात्र, गणेश उत्सवाकरिता आलेल्या चाकरमान्यांसह भक्तांना पुरते नकोसे करुन टाकले आहे. संततधार पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. उद्या पावसाने विश्रांती घेण्याची गरज आहे. अन्यथा गणपतीला घरोघरी आणताना लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. (वार्ताहर)
सिंधुदुर्गात पावसाचा कहर
By admin | Published: August 27, 2014 10:32 PM