सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहत असून काही भागात पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक १८३.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाने शतक केले असून सरासरी १२७ मिमी पाऊस झाला आहे. एकूण सरासरी १३७१.१ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सरासरी वाढली आहे.तालुकानिहाय पावसामध्ये देवगड- ९२.७ (१२२४.४), मालवण- ११७.७ (१३१९.२), सावंतवाडी- १५४.५ (१६०२), वेंगुर्ला- १८३.७ (१४०९.५), कणकवली- ९५.७ (१२३४.३), कुडाळ- १५२ (१४५४.८), वैभववाडी- ११७.५ (१३८९.९), दोडामार्ग- ११२.३ (१४७८.५) असा पाऊस झाला आहे.जुलैच्या पहिल्या आठवड्यात नेहमीपेक्षा दुप्पट पाऊसगेल्यावर्षी आजच्या दिवसापर्यंत जिल्ह्यात १ हजार १३१ पूर्णांक १ मिमी पावसाची नोंद झाली होती. पावसाची टक्केवारी ४६.६ इतकी होती. आजपर्यंतच्या सरासरीचा विचार करता यंदाच्या वर्षी जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ११९.३ टक्के पाऊस झाला आहे. जूनमध्ये पावसाची टक्केवारी ८९.३ टक्के इतकी होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने तूट भरून काढली असून सरासरीच्या २१७.३ टक्के पाऊस झाला आहे. म्हणजेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात नेहमीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे.जिल्ह्यातील १ मध्यम, १२ लघु प्रकल्प फुल्लतिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या २४ तासात ७०.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये ३४४.०७९ द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ७६.९१ टक्के भरले आहे. तसेच जिल्ह्यातील कोर्ले सातांडी हा मध्यम प्रकल्प आणि १२ लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.आंबेरी पूल पाण्याखालीकुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील आंबेरी येथील पूल दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्याखाली जातो. त्यामुळे शिवापूर, वसोली, आंजिवडे, कुपवडे, निळेली आदींसह दशक्रोशीतील २७ गावांचा संपर्क काही काळ तुटतो. मात्र, पावसाचा जोर कमी झाला की परिस्थिती पूर्वपदावर येते. गेल्या आठवडाभरात अशी स्थिती तीन वेळा आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने बॅकलॉग भरला, वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 3:53 PM