वैभव नाईक यांच्यासह केली पाहणीलोकमत न्यूज नेटवर्ककणकवली : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या कणकवलीतील श्रीधर नाईक बालोद्यान व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवरायांचा पुतळा नव्याने उभारण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत.मंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांसमवेत कणकवलीतील या दोन्ही ठिकाणी शनिवारी भेट देऊन पाहणी केली. तसेच याकामांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निधी कमी पडत असल्यास कणकवली शहराचे वैभव जपण्यासाठी या कामांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी दिला जाईल . असे मंत्री सामंत यांनी यावेळी जाहीर केले.तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी निश्चित केलेल्या जमिनीचा प्रस्ताव देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना यावेळी केल्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या नियमामध्ये बसवून या पुतळ्याचे बांधकाम करावे अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. जर हे काम त्यांना शक्य झाले नाही तर कणकवलीच्या वैभवात भर पाडणाऱ्या श्रीधर नाईक बालोद्यान व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जेवढा खर्च लागेल तेवढा जिल्हा नियोजन मधून करणार असल्याचेही यावेळी मंत्री सामंत यांनी सांगितले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, संजय पडते,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे.पवार,पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता पाटील, नीलम पालव, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, कन्हैया पारकर, सुशांत नाईक, भूषण परुळेकर, भाई परब, सोमा गायकवाड , पारकर , दिलीप बिल्डकॉन कंपनीचे के. गौतम,आदी यावेळी उपस्थित होते.