कणकवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीच्या चौकशीची नोटीस पाठविल्याने राज्यात मनसैनिक शासनाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरण्याच्या मन:स्थितीत आहेत. मात्र, निव्वळ राज ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे व आदेशाने मनसैनिकांनी शांततेने निषेध नोंदविण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्गात मनसैनिक कुडाळ येथील हॉटेल आरएसएन येथे शासनाच्या निषेधार्थ निषेध सभा घेणार आहेत.
सिंधुदुर्गातील सर्व विरोधी पक्षांनी या सभेत सहभाग घेऊन शासनाचा निषेध नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे. येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत मनसे वैभववाडी तालुकाध्यक्ष तावडे, कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, संतोष सावंत यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.उपरकर म्हणाले, राज ठाकरे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता पंतप्रधान व गृहमंत्री म्हणजेच मोदी - शहा जोडी कशी फसवी व जनतेची दिशाभूल करणारी आहे हे दाखवून दिले होते. जनतेला दिलेला शब्द पाळला जात नाही आणि भ्रष्टाचार कशाप्रकारे वाढला आहे हे लोकांसमोर व्हिडीओच्या माध्यमातून आणले होते. जनतेच्या मनात तीव्र संताप असतानाही ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून केंद्रात भाजपाचे सरकार आले. ईव्हीएम मशीनबाबत राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन सर्व नेत्यांना एकत्र करीत सरकार कशाप्रकारे आवाज दाबत आहे हे जनतेला पटवून सांगितले होते.त्यामुळे ठाकरे यांना ईडीची नोटीस पाठवून धमकावण्याचे प्रकार सरकार करीत आहे. मात्र, ईडीच्या नोटिसीला आपण भीक घालत नाही असे ठाकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तर मनसैनिकही ईडीच्या नोटिसीला किंमतही देत नाहीत. लोकसभेप्रमाणे राज्याच्या निवडणुकीत घोटाळे बाहेर काढून जनतेला मंत्र्यांचे व सरकारचे खरे रुप राज ठाकरे हे दाखवून देतील. याची भिती आणि धास्ती घेऊन सरकार ऐन निवडणुकीच्या तोंडावर ईडीची नोटीस देऊन मनसेला घाबरविण्याचा प्रयत्न करीत असले तरी मनसैनिक मात्र नव्या जोमाने जागा झाला असून केवळ राज ठाकरे यांनी आवाहन केल्याने मनसैनिक शांत असल्याचे परशुराम उपरकर म्हणाले. आज ठाकरे याना नोटीस बजावली. उद्या अन्य कोणत्या नेत्याला ईडीची भीती दाखविली जाईल.जनतेने आता सरकार विरोधात आवाज उठविण्याची गरज आहे. म्हणूनच जिल्ह्यातील सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निषेध सभेत सहभागी होण्याचे आवाहन मनसेतर्फे करण्यात येत असल्याचे यावेळी उपरकर यांनी सांगितले.