सिंधुदुर्गनगरी : वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप यांनी या नगरपंचायतीतील क्रीडा साहित्याचा ठेका घेतल्याची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवून ठेवली. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे याबाबत वेंगुर्ले येथील सुनील डुबळे यांनी केलेले अपिल जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी फेटाळून लावले आहे. त्यामुळे गिरप यांचे नगराध्यक्षपद अबाधित राहिले आहे. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी वेंगुर्ले नगरपरिषदेची निवडणूक होऊन भाजपचे उमेदवार राजन गिरप हे थेट नगराध्यक्षपदाच्या या निवडणुकीत विजयी झाले होते. तर या नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि या नगराध्यक्ष निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सुनील डुबळे हे पराजित झाले होते. त्यांना दोन नंबरची मते मिळाली होती. या निवडणुकीनंतर सुनील डुबळेयांनी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले राजन गिरप हे या नगरपरिषदेचे ठेकेदार म्हणून कार्यरत असून, त्यांनी शाळांना शालेय साहित्य पुरविण्याचा ठेका घेतला होता. मात्र, ही बाब त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या प्रतिज्ञापत्रात लपविली होती. त्यामुळे त्यांचे नगराध्यक्षपद रद्द करून त्या नंतरची दोन नंबरची मते आपल्याला मिळाली आहेत. त्यामुळे आपल्याला या नगराध्यक्षपदावर विजयी घोषित करावे, असे अपिल केले होते. हे अपिल जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी फेटाळले आहे. (प्रतिनिधी)हे मुद्दे ठरले महत्त्वाचे राजन गिरप यांच्या विरोधातील अपिल निकालात काढताना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी असे म्हटले आहे की, गिरप यांनी घेतलेल्या ठेक्याची पूर्तता निवडणुकीपूर्वीच झाली होती. तसेच याबाबत गिरप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी डुबळे यांनी याबाबत हरकत घेतली नव्हती. ती हरकत त्यावेळी दुसऱ्या एका उमेदवाराने घेतली होती. परंतु, ती त्यावेळी फेटाळण्यात आली होती, आदी कारणे देत हे अपिल जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले. त्यामुळे नगराध्यक्ष राजन गिरप यांचे पद अबाधित राहिले आहे.
राजन गिरप यांचे नगराध्यक्षपद अबाधित
By admin | Published: April 12, 2017 10:46 PM