सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात निवडणुकीला गालबोट लागणारा प्रकार घडला असून, सहकार वैभव पॅनेलचे प्रचारप्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांची सावंतवाडीतील पर्णकुटी विश्रामगृहावर उभी करून ठेवलेली इनोव्हा कार अज्ञातांनी फोडली. यात कारचे मोठ्या प्र्रमाणात नुकसान झाले असून, इनोव्हा कारच्या पुढच्या व मागच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. तसेच आरसाही टाकून देण्यात आला आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. या निवडणुकीचा प्रचार रविवारी थंडावला असून, सध्या गुप्त प्रचारावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी काँग्रेस आघाडीचे उमेदवार तसेच शिवसेना-भाजपचे उमेदवार प्रचारासाठी सर्वत्र फिरत आहेत. सोमवारी दुपारी माजी आमदार राजन तेली यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषद घेतली व ते कुडाळकडे आपल्या मित्राच्या कारने रवाना झाले. यावेळी त्यांची इनोव्हा कार (एमएच ०७ पी ९००९) पर्णकुटी विश्रामगृहाकडे उभी करून ठेवण्यात आली होती. सायंकाळी ६.४५ च्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी विश्रामगृह परिसरात कोण नसल्याचे पाहून गाडीच्या मागील व पुढील दोन्ही काचा फोडल्या. तसेच गाडीच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. गाडीचा आरसा बाहेर फेकून देण्यात आला होता. एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर हा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही. सायंकाळी उशिरा विश्रामगृह परिसरात अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी जमा झाल्यानंतर गाडीवर हल्ला झाल्याचे कळले. घटनेनंतर सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. तसेच कारची पाहणी केली. उशिरापर्यंत कारबाबत कोणीही तक्रार देण्यास पुढे आले नव्हते. माजी आमदार राजन तेली हे कुडाळ येथे असल्याने ते उशिरा प्रचार संपवून आल्यानंतर तक्रार देतील, असे त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी या घटनेनंतर शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवला आहे. कडक कारवाई करा : पालकमंत्री घटना गंभीर असून, सावंतवाडीसारख्या ठिकाणी असे कृत्य होणे क्रमप्राप्त नाही; पण पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन कडक कारवाई करावी. मी पोलिसांना तसे आदेश दिले असून, जिल्ह्यात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी प्रयत्न राहील, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. घाबरणार नाही : तेली माझी कार फोडली. मला मारण्याचा विचार होता. अशा भ्याड हल्ल्याला मी घाबरणार नाही. दहशत निर्माण करून मतदारांना वळविण्याचा हा प्रयत्न आहे.
राजन तेलींची कार फोडली
By admin | Published: May 05, 2015 12:48 AM