सिंधुदुर्ग : संपुर्ण राज्याचे तसेच जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला. या निवडणुकीत राणे कुटुंबियांनी आपला करिष्मा दाखवून दिला. या निकालांमध्ये भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलने ११ जागांवर विजय मिळवत बँकवर सत्ता काबीज केली आहे. तर शिवसेना आणि महाविकास आघाडीला ८ जागावर समाधान मानावे लागले.जिल्हा बँक निवडणूकीत भाजपचे पॅनल निवडून आले असले तरी भाजपच्या १९ पैकी १९ जागा निवडून आणू न शकल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यापुढे भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याची घोषणा राजन तेली यांनी केली.दरम्यान या निवडणुकीत भाजपने जिल्हा बँकेवर सत्ता मिळवली असली तरी भाजपाचे ज्येष्ठ नेते राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. पतसंस्था मतदार संघातून राजन तेली विरुद्ध शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांच्यात झालेल्या लढतीत नाईक यांनी तेलींचा पराभव केला. या निवडणुकी दरम्यान जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यातच सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच संवेदनशील झाली होती. या हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावरही आरोप झाले. तसेच त्यांचा जामीन अर्जही कोर्टाने फेटाळला आहे, अशा वातावरणात झालेल्या या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलने बाजी मारली.
राजन तेलींकडून भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा, एकतर्फी सत्ता आली नसल्याचे शल्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 1:55 PM