कणकवली : विविध निवडणुकीत पाच वेळा पराभूत झालेल्या राजन तेली यांनी आम्हाला सहकार शिकवू नये. जिल्हा बँकेतील सुज्ञ मतदारांनी पुन्हा एकदा राजन तेलींचा पराभव केला आहे. जिल्हा बँकेतील माझा विजय हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यानी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. आपल्या झालेल्या पराभवानंतर भाजपातील गद्दारांची गय करणार नाही म्हणणाऱ्या राजन तेली यांनी आधी भाजपातील गद्दारांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान नूतन जिल्हा बँक संचालक तथा शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिले आहे. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा सेनेचे गीतेश कडू, राजू राठोड, ऍड. हर्षद गावडे, ललित घाडीगांवकर, रिमेश चव्हाण,रुपेश आमडोसकर, तेजस राणे, रोहित राणे, किरण वर्दम, प्रतीक रासम,आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. सुशांत नाईक म्हणाले, वैभव नाईक हे जनतेतून दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेले आमदार आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत आमदारकी मिळालेल्या राजन तेली यांनी वैभव नाईकांवर टीका करू नये. माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, व्हिक्टर डॉन्टस, विद्याप्रसाद बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेत चांगले काम करणार आहोत. महाविकास आघाडीचे आठ संचालक आहेत. जिल्हा बँकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर आम्ही अंकुश ठेवणार आहोत. भाजप मध्ये गद्दारी झाल्याने माझा विजय झाला असे तेली यांना वाटत असेल तर ते चूक आहे असेही नाईक यांनी सांगितले. ते म्हणाले, कणकवली विधानसभा मतदारसंघ युवा सेना जिल्हाप्रमुख पदी निवड केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांचे आभार मानतो. आगामी काळात कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यात युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेना बळकट करणार आहोत, असेही नाईक यावेळी म्हणाले.
भाजपातील गद्दारांची नावे राजन तेलीनी जाहीर करावी!, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईकांचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2022 1:06 PM