राजापूर : मागील प्रदीर्घ काळाच्या सत्तेचा अनुभव असणारे सहकार पॅनेल तर त्यांना चितपट करण्याच्या हेतूने कडे आव्हान देत निवडणुकीत उतरलेले शिवसेना प्रणीत शिवसंकल्प पॅनेल यांच्यातील ‘काँटेकी टक्कर’ यावेळी राजापूर अर्बन बँकेच्यानिवडणुकीत पाहावयास मिळणार आहे. सहकार क्षेत्रात केवळ राजापूरच नाही; तर संपूर्ण जिल्ह्याबाहेर आपल्या कार्याच्या कक्षा रुंदावू पाहणाऱ्या राजापूर अर्बन बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही पॅनेलमध्ये जोरदार चुरस लागली आहे.राजापूर अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक ७ जूनला होणार आहे. त्यासाठी दोन पॅनेल समोरासमोर उभी ठाकली असून, एकूण १३ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. त्यापैकी २६ उमेदवार सहकार व शिवसंकल्प या दोन पॅनेलमधून रिंगणात आहेत. उर्वरित आठ उमेदवार अपक्ष आहेत.या निवडणुकीत सहकार पॅनेलकडून विद्यमान चेअरमन हनिफ काझी, राजेंद्र कुशे, रज्जाक डोसानी, इब्राहीम बलबले, जयंत अभ्यंकर, धनश्री मोरे असे सहा विद्यमान संचालक उभे असून, शिवसेना पुरस्कृ त शिवसंकल्प पॅनेलकडून दीनानाथ कोळवणकर, सुधीर खडपे व शांताराम शेडेकर असे तीन संचालक आपले नशीब आजमावत आहेत. दोन्ही पॅनेलच्या उर्वरित उमेदवारांपैकी रविकांत रुमडे व विजय पाध्ये हे यापूर्वी एकवेळा बँकेवर संचालक म्हणून निवडून गेले होते. उर्वरित उमेदवार प्रथमच रिंगणात उतरले आहेत.राजापूर अर्बन बँकेवरील सहकार पॅनेलमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप असे तीन राजकीय पक्ष एकत्र बनवलेले आहे. गतवेळी शिवसेनेला या पॅनेलमध्ये सामावून घेण्यात आले होते व त्यांच्यासाठी दोन जागा सोडण्यात आल्या होत्या. नंतर विविध पक्षातील काही असंतुष्टांनीच आपापले अर्ज भरल्याने निवडणूक झाली होती व सेनेचे दोन्ही सदस्य विजयी झाले होते. मात्र, नंतरच्या राजकीय क्षेत्रात नाट्यमय घटना घडत राजकीय क्षेत्राशी संबंधित असणारे सेनेच्या त्या दोन्ही संचालकांनी पक्षाचा त्याग करत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे सेनेची संचालकांची संख्या शून्यावर आली होती.सहकार पॅनेलमध्ये स्थान मिळालेल्या शिवसेनेला यावेळी डावलण्यात आले. त्यामुळे चिडलेल्या शिवसेनेने सर्वच्या सर्व म्हणजे तेरा जागी आपले उमेदवार उभे केले आहेत. यावेळी सहकार पॅनेलला जोरदार टक्कर द्यायचीच व जास्तीत जास्त जागा जिंकून बँकेवर भगवा फडकवायचा, या उद्देशाने शिवसेनेचे सर्वच शिलेदार कामाला लागले आहेत. (प्रतिनिधी)मागील काही निवडणुकांत सेनेने या बँकेच्या निवडणुकीत मोठा सहभाग घेऊन आपले पूर्ण पॅनेल उभे केले होते. पण, सेनेला कधीही एक जागा जिंकता आलेली नव्हती. तरीही नाऊमेद न होता शिवसेनेने यावेळी सहकार पॅनेलला चांगलाच धडा शिकवण्याच्या उद्देशाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.सेनेने तगडे आव्हान दिल्यामुळे सत्ताधारी सहकार पॅनेलदेखील त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. मागील अनेक वर्षे संचालकपदासह अध्यक्ष, उपाध्यक्ष आदी पदे भूषवलेली मंडळी सहकार पॅनेलमधून रिंगणात आहेत. सहकार पॅनेलचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा असल्याने पॅनेलमध्ये काहीशी निश्चिंतता आहे.मागील काही निवडणुकांत सेनेने या बँकेच्या निवडणुकीत मोठा सहभाग घेऊन आपले पूर्ण पॅनेल उभे केले होते. पण, सेनेला कधीही एक जागा जिंकता आलेली नव्हती. तरीही नाऊमेद न होता शिवसेनेने यावेळी सहकार पॅनेलला चांगलाच धडा शिकवण्याच्या उद्देशाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.सेनेने तगडे आव्हान दिल्यामुळे सत्ताधारी सहकार पॅनेलदेखील त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. मागील अनेक वर्षे संचालकपदासह अध्यक्ष, उपाध्यक्ष आदी पदे भूषवलेली मंडळी सहकार पॅनेलमधून रिंगणात आहेत. सहकार पॅनेलचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा असल्याने पॅनेलमध्ये काहीशी निश्चिंतता आहे.
राजापूर अर्बनमध्ये सत्तेसाठी होणार जोरदार झुंज
By admin | Published: May 14, 2015 10:32 PM