राजापूर/ कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा पोलिसांनी हटकल्यानंतर न थांबताच वेगात पंजाबकडे जाणारा मोठा ट्र्क राजापुरातील नेरके - खरवते यादरम्यान बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास महामार्गाच्या कडेला उलटला. त्यानंतर चालक त्या ठिकाणाहून तत्काळ पसार झाला आहे, तर पोलिसांनी ट्रकच्या क्लिनरला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील पोलिस यंत्रणेची झोप उडविणारा ट्रकचालक कोणत्या कारणास्तव पोलिसांना चकवत होता, याबाबतचा उलगडा होऊ शकला नाही. याबाबतचा तपास पोलिस यंत्रणेकडून सुरू होता.गोव्याकडून पंजाबकडे चाललेला मोठा ट्रक (पीबी १३/ एआर ७४२७) हा कच्चे लोखंड घेऊन चालला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येताच बांदा चेकपोस्ट येथे असलेल्या पोलिसांनी तो ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या ट्रकचालकाने न थांबताच अधिक वेगाने पुढे नेला. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक वाढला व त्यांनी तत्काळ संपूर्ण जिल्हाभर वायरलेसवरून संदेश दिला; पण काही उपयोग झाला नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ पोलिसांना माहिती समजताच त्यांनी ट्रकचा पाठलाग केला, तसेच युवक कॉँग्रेसचे पदाधिकारी आनंद शिरवलकर यांनीही चारचाकी गाडीने या ट्रकचा पाठलाग केला. कसाल येथेही वाहतूक पोलिसांना न जुमानता हा ट्रक कणकवलीच्या दिशेने त्या चालकाने पळविला. अपघात झालेल्या ठिकाणी पोलिसांना ट्रकचा क्लिनर तेथे सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.या कारवाईत राजापूरचे पोलिस निरीक्षक विकास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक फाळके, सहायक पोलिस उपनिरीक्षक बसवंत, पोलिस काँस्टेबल युवराज सूर्यवंशी, योगेश भाताडे, के. आर. तळेकर, संतोष सडकर, होमगार्ड सकपाळ, आदी सहभागी झाले होते. राजापूर पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत. खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार शामराव तिबिले यांच्या तक्रारीवरून ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)कणकवलीत बॅरिकेटस् उडविलेकणकवली पोलिसांना याबाबत माहिती समजताच त्यांनी पटवर्धन चौकात बॅरिकेटस् लावून नाकाबंदी केली. याचवेळी कॉँग्रेस कार्यालयाजवळ डबलबारी भजन सुरू असल्याने तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनीही हा ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने बॅरिकेटस् उडवत हा ट्रक खारेपाटणच्या दिशेने नेला. कणकवली पोलिस निरीक्षक सुनील मोरे यांच्यासह पथकाने या ट्रकचा पाठलाग केला. तसेच कणकवलीतील युवक कॉँग्रेसचे पदाधिकारी संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, शिवसैनिक भैया नाईक, राजा पवार, रमेश चव्हाण यांच्यासह चाळीसहून अधिक कार्यकर्त्यांनी ट्रकचा पाठलाग केला. सिंधुदुर्गातून रत्नागिरीत प्रवेशखारेपाटण चेकपोस्ट येथे लावलेले बॅरिकेटस् उडवत तो ट्रक रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत राजापूरच्या दिशेने नेला. रत्नागिरी जिल्हा अधीक्षक कार्यालयाला वायरलेस संदेश आला व सर्वप्रथम राजापूर पोलिसांना अलर्ट करण्यात आले. तत्काळ महामार्गावर बॅरिकेटस् लावण्यात आले. पोलिस आपला पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच वाहनचालकाने आणखी वेग वाढविला. काही ठिकाणी तर अपघात होण्याचीच शक्यता होती. सुदैवाने ते टळले; मात्र राजापूर तालुक्यातील नेरके-खरवते या दरम्यान राजापूर पोलिसांचा होत असलेला पाठलाग याकडेच लक्ष राहिल्याने चालकाचे ट्रकवरचे नियंत्रण सुटले व तो ट्रक लगतच्या गटारात जाऊन कलंडला. त्यानंतर चालकाने तेथून पळ काढला होता.
राजापुरनजीक भरधाव ट्रक उलटला
By admin | Published: October 13, 2016 2:17 AM