देवगड : देवगड समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली ‘राजलक्ष्मी’ ही यांत्रिक नौका शनिवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास मालवण येथील समुद्र किनाऱ्यापासून ४५ वाव अंतरावर सापडली. नौकेच्या इंजिनामधील बिघाडामुळे ही नौका वाऱ्याच्या वेगात भरकटत मालवण येथे जाऊन पोहोचली होती. या नौकेतील सर्व खलाशी सुखरुप आहेत. नौका खोल समुद्रात भरकटू नये म्हणून खलाशांनी नौका नांगरून ठेवण्यात यश मिळविले.देवगड येथील अश्विनी धुरी यांच्या मालकीची यांत्रिक नौका २६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास देवगड बंदरातून मासेमारी करण्यासाठी निघाली होती. या नौकेतील खलाशांना समुद्रात मासेमारी करण्याचे ठिकाण निश्चित करुन नौकामालक धुरी यांनी नौका रवाना केली होती. या दरम्यान नौकेच्या इंजिनमध्ये मोठा बिघाड झाल्यामुळे नौका एका जागेवर स्थिर उभी करण्याशिवाय नौकेवरील खलाशांना पर्याय नव्हता. मात्र याच दरम्यान अन्य नौकांनी मासेमारीसाठी आपले जाळे तेथील परिसरात टाकल्यामुळे नौका नांगर टाकून उभी करणे शक्य नव्हते. याचा धोका अन्य नौकांच्या जाळयांना पोहोचणार होता. नौका बंद पडली त्यावेळी वाऱ्याचा वेग थोडासा जास्त असल्यामुळे या क्षेत्रातून दूर जाण्यासाठी नौका वाहत पुढे नेण्यात आली. सुमारे ४५ वाव परिसरात नौका पोहोचल्यावर नौकेवरील नांगर पाण्यात टाकून एकाच जागेवर नौका उभी करण्यात आली. सकाळी मासेमारीसाठी गेलेल्या नौकेतील कर्मचाऱ्यांचा संपर्क किनाऱ्यावरील नौकामालक धुरी यांना होत नव्हता. यात एक दिवस गेल्यामुळे त्यांची नौका भरकटल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी देवगड पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर कोस्टगार्ड व पोलिसांनीही शोध मोहीम सुरु केली.नौकामालक धुरी यांनी नौका रवाना करताना मासेमारीची जागा निश्चित केली होती. त्यानुसारच त्यांनी या नौकेचा शोध घेताना त्या मार्गाने जाण्याचे शुक्रवारी ठरविले. याच दरम्यान देवगड येथील जुवाटकर यांच्या बोटीतील खलाशांनी राजलक्ष्मी ही नौका मालवण येथील समुद्रात उभी असलेली दिसल्याचे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे अंदाज घेत दुसऱ्या नौकेने धुरी यांना सांगितलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर नौका व त्यातील कर्मचारी सुरक्षित असल्याचे आढळून आले. नौकेवरती २५ दिवस पुरेल एवढे खाद्यपदार्थ असल्यामुळे या नौकेवरील खलाशांना त्याचा कोणताही त्रास झाला नसल्याचे नौकामालक धुरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
भरकटलेली ‘राजलक्ष्मी’ नौका सापडली
By admin | Published: January 29, 2017 10:51 PM