तळवडे : सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून जाणारी दादर-सावंतवाडी (राज्यराणी एक्स्प्रेस) ही रेल्वेगाडी प्रशासनाने झाराप येथून मुंबईच्या दिशेने सोडल्याने त्याचा रेल्वे प्रवाशांना त्रास होत असल्याने ही रेल्वे सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून सोडावी, अशी मागणी शिवसेना पक्षातर्फे सावंतवाडी रेल्वेस्थानक मास्तर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी सावंतवाडी तालुका शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, पंचायत समिती सदस्य अशोक दळवी, तळवणे विभागप्रमुख विनोद काजरेकर, तळवडे शाखाप्रमुख प्रशांत बुगडे, विजय राऊळ, मळगावचे सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सोनुर्लेकर, गुरुनाथ नाईक व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून जी राज्यराणी सुटत होती, ती झाराप रेल्वे स्थानकावरून सोडल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. ही गाडी झाराप येथे थांबवावी; पण या गाडीतील प्रवाशांना सावंतवाडी रेल्वे स्थानकावर सोडावे. तसेच जाणाऱ्या गाडीतील प्रवाशांना सावंतवाडी येथून न्यावे. ही गाडी झाराप किंवा मडुरा येथे कोठेही थांबवा; पण सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा, ज्याप्रमाणे इतर गाड्या जातात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होणार नाहीत, अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रवाशी वर्गातर्फे केली आहे. (प्रतिनिधी)प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष सावंतवाडी स्थानकावरून सुटणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेस गाडीचा थांबा झाराप येथे केल्याने राजकीय वाद वाढला आहे; पण रेल्वे प्रशासन यावर कोणती पावले उचलते, ही महत्त्वाची बाब आहे. एक महिना ही गाडी झाराप रेल्वे स्थानकावरून सुटेल, असे पत्रक रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धकेले आहे; पण प्रवाशांची वाढती मागणी, राजकीय निवेदन याची दखल कोकण रेल्वे प्रशासन घेते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘राज्यराणी’ सावंतवाडीतून सोडावी
By admin | Published: March 14, 2016 11:19 PM