कणकवली (सुधीर राणे ):' राम जन्मला ग सये, राम जन्मला ' असे पाळणा गीत म्हणत मोठ्या आनंदात परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या परिसरातील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात शनिवारी भावपूर्ण वातावरणात श्री रामजन्म सोहळा पार पडला. राम नामाच्या गजराने येथील परिसर दुमदुमुन गेला होता.
श्री राम नवमी उत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार पासूनच परमहंस भालचंद्र महाराज संस्थान परिसरात भाविकांची लगबग सुरु होती. श्री राम जन्माची तयारी करण्यात आली होती. दरवर्षी प्रमाणेच शनिवारी सकाळी श्री काशिविश्वेश्वर मंदिरात काही धार्मिक विधि पार पडले. त्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कीर्तनाला प्रारंभ झाला. श्रीरामाची महती वर्णन करत कीर्तनकारानी राम जन्माची कथा सांगितली. दुपारी १२ वाजता कीर्तनाच्या माध्यमातून राम जन्म झाला.
त्यानंतर श्रीरामाच्या बाल मूर्तिला पाळण्यात घालुन झोके देण्यात आले. तसेच पारंपारिक पाळणा गितेही म्हणण्यात आली. त्यानंतर भाविकानी श्रीराम मुर्तीचे दर्शन घेतले. तसेच त्यांना प्रसाद वाटप करण्यात आले.हा श्रीराम जन्माचा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी भाविकानी गर्दी केली होती. या रामजन्म सोहळ्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
दिवसभर या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, सचिव अशोक सापळे, व्यवस्थापक विजय केळुसकर , गुरु करंबेळकर ,बंडू हर्णे, चेतन अंधारी, प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते.
कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज संस्थान परिसरातील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात शनिवारी भावपुर्ण वातावरणात श्री रामजन्म सोहळा झाला.