आचरा : रामनवमी उत्सवानिमित्त रविवारी येथील रामेश्वर मंदिरात शाही थाटात रामजन्म सोहळा पार पडला. ‘राम जन्मला गं सखी, राम जन्मला’ हे गीत गुणगुणत, परिसरात तोफांच्या आवाजात आणि रामनामाच्या जयघोषात आचरानगरी दुमदुमून गेली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांसह रामेश्वर मंदिरातील रामजन्म सोहळा शाही थाटात पार पडला.ऐन माध्यान्हीची वेळ... भर दुपारचे बारा वाजलेले... उन्हाचे चटके पायांना बसत होते... सूर्य डोक्यावर आला होता... वातावरणातील उन्हाच्या झळा वाढलेल्या... अशावेळी रामेश्वर मंदिराचा परिसर भाविकांनी फुलून गेला होता. हरिदास बुवांचे कीर्तन रंगात आले होते आणि ऐतिहासिक रामेश्वर मंदिराच्या परिसरात तोफा दणाणल्या. नगरखान्यात मंगलवाद्ये वाजू लागली. बंदुकांच्या फैरी झडू लागल्या. रामेश्वर मंदिरात पाळणा हळूहळू खाली येऊ लागला आणि आरंभात ‘जय जय रघुवीर समर्थ’ची ललकारी भाविकांच्या तोंडातून घुमली. या उत्सवानिमित्त गुलाल, अक्षतांची उधळण सुरू झाली. हा मंगल सोहळा होता राम जन्मोत्सवाचा...!या क्षणाची ‘याची देही, याची डोळा’ साक्षात अनुभूती घेण्यासाठी हजारो भाविकांनी आचरा येथील रामेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये गर्दी केली होती. सर्वत्र एकच आवाज घुमत होता, ‘राम जन्मला गं सखी, राम जन्मला’. राम जन्मोत्सवाचा हा अनोखा दिमाखदार सोहळा संस्थानकालीन आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वराच्या मंदिरासह जिल्ह्याच्या विविध भागात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.उत्सवाच्या मंगलदायी क्षणांची अनुभूती घेण्यासाठी रामेश्वर मंदिराचा परिसर भाविकांनी फुलून गेला होता. शाही संस्थानी थाटात रामेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर सुंठवडा प्रसाद व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.उत्सवासाठी आचरा प्राथमिक आरोग्यकेंद्राची यंत्रणा तसेच आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. आर. धुमाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्सव शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.आचरा येथील रामनवमी उत्सवास जिल्ह्याच्या मुख्य न्यायाधीश वि. वि. विरकर उपस्थित होत्या. यावेळी संस्थानच्यावतीने त्यांचे शाही थाटात स्वागत करण्यात आले. संस्थानच्यावतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.
रामेश्वर मंदिरात रामनामाचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:38 PM
आचरा : रामनवमी उत्सवानिमित्त रविवारी येथील रामेश्वर मंदिरात शाही थाटात रामजन्म सोहळा पार पडला. ‘राम जन्मला गं सखी, राम जन्मला’ हे गीत गुणगुणत, परिसरात तोफांच्या आवाजात आणि रामनामाच्या जयघोषात आचरानगरी दुमदुमून गेली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांसह रामेश्वर मंदिरातील रामजन्म सोहळा शाही थाटात पार पडला.
ठळक मुद्देरामनवमी उत्सव : आचरा येथील मंदिर परिसरात तोफा दणाणल्या; शाही थाटात पार पडला रामजन्म सोहळा रामेश्वर मंदिराचा परिसर भाविकांनी फुलून गेला