वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या महिला बालकल्याण सभापती पदाच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक न दिल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटांचे दोन्ही अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे महिला बालकल्याण समितीचे सभापती व उपसभापती पदे रिक्त राहिली आहेत. तर सार्वजनिक बांधकाम, विकास, नियोजन व पर्यटन समिती सभापतीपदी संपदा राणे व आरोग्य, वीज, शिक्षण व क्रीडा समिती सभापतीपदी अक्षता जैतापकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. वैभववाडी नगरपंचायतीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी समीर घारे, तहसीलदार जी. आर. गावीत यांच्या उपस्थितीत विषय समित्यांची सभापती निवड प्रक्रिया मंगळवारी झाली. महिला व बालकल्याण समितीमध्ये काँग्रेसच्या दीपा गजोबार, समिता कुडाळकर तर भाजपाच्या सुचित्रा कदम व सुप्रिया तांबे या चार सदस्या आहेत. त्यामुळे महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी वाभवे-वैभविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या दीपा गजोबार तर वैभववाडी नगरविकास आघाडीतर्फे भाजपच्या सुचित्रा कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र या दोन्ही अर्जावर अनुमोदक नव्हते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी घारे यांनी काँग्रेसच्या गजोबार व भाजपच्या कदम यांचे सभापती पदासाठी दाखल केलेले अर्ज अवैध ठरविले. त्यामुळे महिला बालकल्याण समितीचे सभापतीपद रिक्त राहिले आहे. महिला बालकल्याणचे दोन्ही अर्ज अवैध ठरविल्यानंतर भाजप, शिवसेनेचे नगरसेवक निघून गेले. त्यानंतर बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती जाहीर करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम, विकास, नियोजन व पर्यटन समितीच्या सभापतीपदी स्वप्निल इस्वलकर यांची वर्णी लागेल अशी शक्यता असतानाच संपदा शिवाजी राणे यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे राणे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच आरोग्य, वीज, नियोजन व पर्यटन समिती सभापतीपदी अक्षता अरुण जैतापकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपनगराध्यक्ष संजय चव्हाण हे बाजार, पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीचे पदसिद्ध सभापती आहेत. बांधकाम व आरोग्य सभापती पदाच्या निवडी जाहीर करीत निवडणूक निर्णय अधिकारी समीर घारे व तहसीलदार जी. आर. गावीत यांनी समिती सभापती संपदा राणे व अक्षता जैतापकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, उपनगराध्यक्ष संजय चव्हाण, व काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभागृहातून बाहेर पडल्यावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीच्या नुतन विषय समिती सभापती राणे, जैतापकर यांचा सत्कार केला. तसेच नगरपंचायत आणि आमदार संपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी केली. (प्रतिनिधी)
राणेंना बांधकाम, जैतापकरांना आरोग्य
By admin | Published: December 09, 2015 1:10 AM