मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या अलौकिक दैवशक्तीने नावारूपास आलेले प. पू. सद्गुरु राणे महाराज यांच्या सोमवारी सकाळी कुसरवे येथील मठ परिसरात मंत्रपुष्पात नंदन म्हाडगुत यांनी त्यांच्या देहाला मुखाग्नी दिला आणि आलेल्या भाविकांच्या अश्रूंचा बांध फुटला. सिंधुदुर्गसह गोवा, कोल्हापूर, मुंंबई येथून शेकडो भाविक मठ परिसरात जमा झाले होते. ‘प. पू. सद्गुरू राणे महाराज की जय’ अशा जयघोषात भाविक घोषणा देत आपल्या अश्रूंना आवर घालत होते.प. पू. सद्गुरू राणे महाराज यांनी रविवारी पहाटे मालवण कट्टा येथील नंदन म्हाडगुत यांच्या घरी आपला देह ठेवला. त्यानंतर सकाळी त्यांचा देह अंत्यदर्शनासाठी कुसरवे येथील त्यांच्या मठात ठेवण्यात आला होता. दिवसभर तसेच रात्री भक्तांनी राणे महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर सोमवारी सकाळी मठ परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राणे महाराजांच्या इच्छेनुसार सेवा ट्रस्टने घेतला होता. त्यानुसार सकाळी भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर महाराजांचा देह अंतिम संस्कारासाठी मठाच्या गाभाऱ्यातून परिसरात आणण्यात आला.राणे महाराजांच्या देहावसनानंतर परिसरात एका जागेवर चिरेबंदी चौथरा उभारण्यात आला. हा चौथरा फुलांनी सजविण्यात आला होता. तसेच विविध ठिकाणाहून आलेल्या पुरोहितांनी मंत्रवाचन केले. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास त्यांच्यावर अंतिम संस्काराचा विधी करण्याच्या कामाला सुरूवात झाली. ‘अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज राणे महाराज की जय’ या जयघोषात भाविकांनी महाराजांचे शेवटचे दर्शन घेतले. त्यानंतर नंदन म्हाडगुत यांनी महाराजांना मंत्राग्नी दिला.महाराजांना अग्नी देत असताना भाविकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. अनेकजण आपल्या आठवणी ताज्या करीत अश्रू ढाळत होते. अनेक महिलांनाही अश्रू आवरणे कठीण झाले. यावेळी आमदार वैभव नाईक, विनायक अण्णा राऊळ, काँग्रेस नेते अशोक सावंत, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, विलास हडकर, हसरे महाराज यांच्यासह कोल्हापूर, गोवा, मुंबई मोठ्या प्रमाणात भाविक जमा झाले होते. (प्रतिनिधी)महाराजांच्या अलौकिक चमत्काराचे अनेक पैलूराणे महाराज यांचे चमत्कार हे अलौकिक होते. त्यांनी भारत भ्रमंती करीत गिरनार पर्वतावर तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली होती. १९९१ साली ते सिंधुदुर्गमध्ये आल्यानंतर सिंधुदुर्गमध्येही ते पायीच फिरत असत. त्याच्या पाठीला नेहमी एक पिशवी असायची. त्या पिशवीचा स्पर्श हे भक्तांसाठी महाराजांचे दर्शन घेण्यासारखे होते. काही जणांना ते मारायचेदेखील मात्र, त्यांंचा मार हा शुभसंकेत असायचा. त्यामुळे भक्तांच्या मनात त्यांच्याबाबत आदरच असायचा.
शेकडोंच्या साक्षीने राणे महाराजांना मुखाग्नी
By admin | Published: March 30, 2015 9:48 PM