कणकवली : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तिन्ही जिल्हाप्रमुख भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे. मात्र, राणेंचेच राजकीय अतित्व आता संपत चालले आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मागून राणेंचे कार्यकर्ते फिरत आहेत. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून यापुढेही तो राहणार आहे. हे खेड येथील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला जनतेच्या लाभलेल्या प्रतिसादामुळे दिसून आले आहे. त्यामुळे शिवसेनेला संपविण्याची स्वप्ने कोणी पाहू नयेत असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे. कणकवली येथील विजयभवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, दोन हजार कोटींचा निधी राज्य शासनाने कणकवली विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी दिल्याचेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले. मात्र, यापूर्वी कणकवलीत ८०० कोटींचा एजीडॉटर्स कंपनीचा प्रोजेक्ट, विनोद कांबळी क्रिकेट अकादमी, अडव्हेंचर वोटर स्पोर्ट्स असे प्रकल्पही त्यांनी आणले त्याचे काय झाले? हे येथील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे राणेंच्या घोषणा अतित्वात येणार नाहीत. याउलट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या घोषणा सत्यात उतरल्या आहेत. ७५० कोटींचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. आमदार राणे असू देत किंवा जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष असू देत त्यांनी बँक निवडणुकीवेळी खावटी कर्ज माफ होईल अशी घोषणा केली होती. मात्र, अलीकडेच सादर झालेल्या अर्थसंकल्पात त्याबाबतची तरतूदच करण्यात आलेली नाही. दीपक केसरकर यांच्याबाबत नीलेश राणे एक मत मांडतात. तर नितेश राणे दुसरे मत मांडतात. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन्ही राणे पुत्रांनी आपल्या वडिलांबरोबर एकत्र बसून केसरकर यांच्याबाबतची भूमिका ठरवावी. त्यानंतर ती जनतेसमोर जाहीर करावी. सत्तेसाठी आम्ही कधीही पक्ष बदल केलेला नाही. त्यामुळे शेवटचा आमदार जरी शिल्लक राहिला तरी मी उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहणार आहे. मी पंधरा वर्षे जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे त्यापदाची कोणाला तरी जबाबदारी द्यावी अशी मागणी गेली दोन वर्षे मी उद्धव ठाकरे यांच्याकडे करीत होतो. आता दिलेले तिन्ही जिल्हाप्रमुख सक्षम आहेत. पक्ष प्रमुख वेळोवेळी जी जबाबदारी माझ्यावर देतील, ती समर्थपणे पार पाडली जाईल. आता जरी पक्षाचे नाव व चिन्ह गेले असले तरी आगामी निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ. त्यानंतर चिन्ह व नाव परत मिळवू असेही नाईक म्हणाले.केसरकरांनी शिवसैनिकांचा अपमान केला!आपण पैसे दिल्याने पद दिले. तसेच पैसे दिल्यानेच शिवसेना वाढली असे दीपक केसरकर सांगत आहेत. मात्र, अनेक शिवसैनिकांनी पक्ष वाढीसाठी रक्त सांडले आहे. अनेकांचे जीवन उध्वस्त झाले आहे. त्या शिवसैनिकांनी केलेल्या त्यागामुळे पक्ष वाढला आहे. मात्र, केसरकर यांनी त्या सर्व शिवसैनिकांचा अपमान केला आहे असेही वैभव नाईक म्हणाले.
राणेंचेच राजकीय अतित्व संपत चाललंय, आमदार वैभव नाईकांची टीका
By सुधीर राणे | Published: March 13, 2023 1:45 PM