वैभववाडी : मारामारी करणे एवढाच उद्योग असणारे आमदार नीतेश राणे जिल्ह्यात आणि राज्यात हाणामाऱ्या करुन झाल्यावर आता हाणामाऱ्यांसाठी देशातील स्थळांचा शोध घेत आहेत, अशी खिल्ली उडवत शिक्षकांच्या कार्यक्रमात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर टीका करताना आमदार राणेंनी औचित्य भंग करीत मुक्ताफळे उधळून बालिश बुध्दीचे दर्शन घडविले, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, तालुकाध्यक्ष राजेंद्र्र राणे, नगरसेवक सज्जनराव रावराणे, गजानन पाटील, सुधीर नकाशे आदी उपस्थित होते. जठार पुढे म्हणाले की, आमदार राणेंनी तावडे यांच्यावर टीका करण्यापेक्षा १५ वर्षे सत्तेत असताना आपल्या नेत्यांनी काय केले? आणि युतीची सत्ता आल्यावर अवघ्या दीड वर्षात वैभववाडी तालुक्यात किती निधी आला, याचा तौलनिक अभ्यास करावा. मोठेपणा करुन, खोटं बोलून नगरपंचायतीची सत्ता मिळवली. सत्ता घेऊन काय केलं? अमिषं दाखवून, माणसं फोडून सत्ता ताब्यात घेणं सोपं असतं. पण काम करण्यासाठी संवेदनशील मनाची गरज असते, असा टोला जठार यांनी लगावला.जठार यांनी युती सरकारच्या माध्यमातून तालुक्यात मंजूर झालेल्या विकास कामांची माहिती दिली. ते म्हणाले. आपण विरोधी आमदार होतो म्हणून काँग्रेस या मतदारसंघात निधीच देत नव्हते. परंतु, आम्ही तसे काँग्रेसी पाप करणार नाही. विद्यमान आमदार विरोधी पक्षाचा असला तरी सत्तेच्या काळात काँग्रेसने वैभववाडी तालुक्यात निर्माण केलेला विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्यामुळे विविध योजनांच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्यात सात कोटी रुपये मंजूर करुन आणले आहेत. ज्या सूड भावनेने काँग्रेसचे नेते वागत होते. तसे आम्ही मुळीच वागणार नाही. त्यामुळे पुढच्या काळात तालुक्यातील विकासकामे मार्गी लागलेली दिसतील. जिल्हा वार्षिक योजनेतून सडुरे, कुसूर-तिरवडे, मांगवली या रस्त्यांचे नुतनीकरण केले जाणार आहे. त्यापैकी सडुरे व कुसूर-तिरवडेच्या कामाचा प्रारंभ मंगळवारी करण्यात आला, असे स्पष्ट करीत डोंगरी विकास योजनेतून आचिर्णे, उंबर्डे, नाधवडे, वेंगसर या गावात रस्त्याच्या कामांसाठी निधी मंजूर असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)उड्डाणपूल, आयटीआयचे भूमिपूजन लवकरच रेल्वे उड्डाणपूलाच्या जोडरस्त्यांच्या भूसंपादनासाठी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली असून आयटीआयच्या जागेसाठी शासनाने सुमारे अठरा लाख रुपये दिल्यामुळे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यावर शिक्षण व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आयटीआयच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उड्डाणपूलाच्या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे, अशी माहिती प्रमोद जठार यांनी दिली.तावडेंच्या नखाची सर 'त्यांना' नाही : रावराणेशिक्षणमंत्री विनोद तावडेंचे हेलिकॉप्टर निवडणुकीतच मामांच्या गावात उतरते, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी शिक्षक समितीच्या स्नेहमेळाव्यात केली होती. त्यावरुन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे यांनी तावडेंच्या नखाची तरी सर त्यांना आहे का? वडिलांच्या कर्तृत्वावर किती दिवस मिरवणार आहात? असा खोचक सवाल करुन तावडेंच्या संस्थेतून दरवर्षी गोरगरिबांची शेकडो मुलं फुकट शिकून बाहेर पडतात. मात्र, राणेंच्या शिक्षण संस्थेत लाखो रुपये दिल्याशिवाय प्रवेश मिळत नाही, अशी टीका रावराणेंनी केली.
मारामाऱ्यांसाठी राणे देशात स्थळे शोधताहेत
By admin | Published: April 05, 2016 11:31 PM