कणकवली : राणेंना मतदारांनी नाकारले असल्याने आगामी निवडणुकीत त्यांचा कोणताही पक्ष आणि चिन्ह असले तरी पराभव अटळ आहे. आमचा पक्ष आणि चिन्ह नवीन होते.असे ते म्हणत आहेत. मात्र, २०१४ मध्ये 'हात ' या निशाणीचा शेकडो वर्षे जुना पक्ष असतानाही निलेश राणे यांचा पराभव झाल्याचा आमदार नितेश राणे यांना विसर पडला आहे. असे सांगतानाच मतदारांनी नाकारल्याचे आतातरी राणे यांनी मान्य करावे . असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.
कणकवली येथील विजय भवन मध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले,सिंधुदुर्गातील मतदारांनीही विनायक राऊत यांना भरघोस मतदान केले आहे. भाजपाने प्रामाणिक साथ दिल्याने हा विजय सोपा झाला.त्यामुळे भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आम्ही मनापासुन आभार मानतो. खासदार आणि शिवसेना सचिव म्हणून विनायक राऊत यांची उज्ज्वल कारकीर्द असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांना केंद्रीयमंत्री पदाची संधी देतील असा विश्वास आमदार नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, आगामी निवडणुकीत कोणताही पक्ष आणि चिन्ह घेतले तरी नारायण राणेंचा पराभव अटळ आहे. लोक राणेना कंटाळले आहेत. राणेंच्या कार्यकर्त्याना मते मिळतात, ते निवडणुका जिंकतात मग राणेंचा पराभव का होतो याचे आत्मचिंतन आमदार नितेश राणे यांनी करावे . आमदार नितेश राणे यांच्या खोट्या योजनांचा मतदारांनी पर्दाफाश केला आहे. कणकवली मतदारसंघात त्यांनी खोटी आश्वासने दिली आहेत. त्यांच्या सर्व योजना बंद झाल्या आहेत. त्यांच्या या खोट्या आश्वासनामुळेच त्यांचे कणकवलीतील मताधिक्य घटले आहे. विधानसभेला कणकवली मतदारसंघातही युतीचा आमदार विजयी होणार असुन आगामी काळात अनेक पक्षातील नेते सेना-भाजपात सामील होतील. केंद्रानंतर राज्यातही सेना-भाजपाचेच सरकार येणार असुन स्वाभिमान या सिंधुदुर्गातील प्रायव्हेट लिमिटेड पक्षातील असंतुष्ट पदाधिकार्यांनी पक्षाबाबत वेळीच निर्णय घ्यावा आणि मुख्य प्रवाहात यावे. पराभूत मुलाची समजूत घालण्यासाठी नारायण राणे लोकसभा निवडणुक निकालावर हेराफेरीचा आरोप करीत आहेत . त्यांना लोकांनी नाकारल्याचे आता तरी राणे यांनी मान्य करावे. चार वेळा पराभव पत्करावा लागलेल्या राणे यांना मनातुन पराभव मान्य असेल परंतु मुलाची समजुत काढण्यासाठी ते हेराफेेरीचा आरोप करीत असल्याचे आमदार वैमव नाईक यावेळी म्हणाले.
विनायक राऊत हेे केंद्रात मंत्री असतील !
रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मतदारांनी शिवसेनेचे विनायक राऊत यांना चांगले मताधिक्य मिळवून दिले आहे.विधानसभेतही आमची घौडदौड अशीच सुरू राहणार आहे. तसेच विनायक राऊत हे निश्चितपणे केंद्रात मंत्री असणार आहेत. असेही वैभव नाईक यावेळी म्हणाले.