कणकवली : माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे स्वत:च्या आणि आपल्या मुलांच्या स्वार्थासाठीच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपचा कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा कडाडून विरोध आहे. यासर्व बाबींचा विचार करून पक्षनेतृत्व त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांनी येथे केले.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, सरचिटणीस परशुराम झगडे, महेश सावंत आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.संदेश पारकर पुढे म्हणाले, भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध लोकांचा पक्ष आहे़ देवगड नगरपंचायत निवडणुकीत आमदार नीतेश राणे यांच्या समर्थकांनी माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांच्या कार्यालयावर व माजी आमदार अजित गोगटे यांच्या घरावर अंडी फेकली होती. अशी अनेक कृत्ये त्यांनी केली आहेत. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपात प्रवेश देणार नाहीत. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये चारवेळा पराभव झाल्याने राणेंचा जनाधार संपलेला आहे. त्यामुळे कोणाचा तरी टेकू मिळविण्यासाठी व मुलांच्या पुर्नवसनासाठी राणेंची धडपड सुरू आहे. २०१९ मध्ये कणकवलीत राहीलेले राणेंचे अस्तित्व विधानसभा निवडणुकीत संपेल. त्यांना पुन्हा आपला जनाधार पहायचा असेल तर स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून स्वबळावर ही निवडणूक लढवावी.
नारायण राणे यांनी स्वत:च कणकवली मतदार संघातून भाजपाचा उमेदवार म्हणून नीतेश राणे यांचे नाव जाहीर केले आहे. मात्र, राणेंना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला? विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जिल्हा व राज्य भाजपा कोअर कमिटीत चर्चा करून मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा जाहीर करतील. राणेंचा २०१४ मध्ये कुडाळ आणि मुंबईत असे दोन वेळा पराभव झाला. राणेंच्या मुलाचा २०१४ आणि २०१९ मध्ये पराभव झाला. राणेंचे चार पराभव झाले आहेत. त्यामुळे त्यांचा जनाधार संपलेला आहे. यामुळेच राणेंना भाजपात घेऊन फायदा होणार नाही. उलट राणेंना फायदा होईल. राणे स्वत:च मी भाजपात प्रवेश करणार अशा बातम्या पसरवून निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप संदेश पारकर यांनी यावेळी केला.
ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा एकसंघ आहे. जिल्ह्यातील भाजपा वाढविण्यासाठी संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण, विनोद तावडे, आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार तसेच अन्य पदाधिकाºयांनी फार मेहनत घेतली आहे. जिल्ह्यात भाजपा संघटना मजबूत आहे.
राणे १९९० मध्ये जिल्ह्यात आल्यानंतर मुंबईतील गुंड आणून दहशत पसरवायचे. कालांतराने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनाच गुंड बनविल्याने अनेक जणांना कारावास झाला आहे. त्याला जबाबदार कोण? त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे हे सर्व पाहाता भाजपात त्यांना प्रवेश मिळणार नाही. त्यांचा प्रवेश होणार असता तर यापूर्वीच झाला असता, असाटोलाही संदेश पारकर यांनी यावेळी लगावला.राणेंची सर्वच पक्षांवर टीका
नारायण राणे आतापर्यंत ज्या पक्षात गेले तेथील पक्ष नेतृत्वावर त्यांनी टीका केली आहे. शिवसेना, काँग्रेस या पक्षात असताना त्यांनी टीका केली. तर भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार झाल्यावरही त्यांनी विश्वास यात्रा काढत भाजपवर टीका केली, असेही पारकर म्हणाले.