कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक पार पडली असून काँग्रेसची सत्ता आली आहे. या नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद हे खुला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या पदासाठी पाच जणांची नावे चर्चेत असली तरी विनायक राणे किंवा ओंकार तेली यातील एकाच्या नावावर काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कुडाळ नगरपंचायतीची १७ जागांसाठी निवडणूक पार पडली आणि यामध्ये काँग्रेसचे ९, शिवसेनेचे ६, भाजपचा १ व अपक्ष १ असे नगरसेवक निवडून आले असून, आता या ठिकाणी नगराध्यक्ष कोण बसतो याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.या नगरपंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता आली असल्याने निश्चित येथे काँग्रेसचाच नगराध्यक्ष बसणार आहे. मात्र, नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे खुला प्रवर्गातील असल्याने या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी चुरस ही वाढणार आहे हे निश्चितच.कुडाळ ग्रामपंचायतीमध्ये या अगोदर उपसरपंच असलेले व या नगर पंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १७ सांगिर्डेवाडीमधून आव्हानात्मक आठ विरोधातील उमेदवारांचे चक्रव्यूह भेदून विजयश्री खेचून आणणारे काँग्रेसचे नगरसेवक विनायक राणे, तसेच प्रभाग क्र. २ भैरववाडीचे नगरसेवक ओंकार तेली, प्रभाग क्र. ४ बाजारपेठचे नगरसेवक सुनील बांदेकर, प्रभाग क्र. ६ गांधी चौकचे अनंत धडाम व प्रभाग क्र.१२ हिंदु कॉलनीच्या नगरसेविका संध्या तेरसे अशा नगरसेवकांची नावे नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. काही कालावधीत लागणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनेही येथील नगराध्यक्ष निवड महत्त्वाची ठरणार आहे. (प्रतिनिधी)नगराध्यक्ष निवड राणेंच्या आदेशानुसारचकाँग्रेसची सत्ता आल्याने या ठिकाणी काँग्रेसचाच नगराध्यक्ष बसणार आहे व ज्याचे नाव काँग्रेसचे नेते नारायण राणे जाहीर करतील तोच नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून बसणार आहे, हे निश्चित.
कुडाळ नगराध्यक्षपदी राणे की तेली?
By admin | Published: April 19, 2016 11:43 PM