कणकवली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या आक्रमक भाषणानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडून ठाकरे यांच्यावर टीका केली . माजी मुख्यमंत्री असलेल्या राणे यांनी टीका करताना आपल्या भाषेला मर्यादा घालण्याची गरज आहे . कारण त्यांची वक्तव्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी धोकादायक आहेत, अशी टीका शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केली आहे .याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की , राणे यांचा पूर्वइतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे . राणे सध्या ज्या - पक्षात आहेत , त्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तो भर विधानपरिषदेत वाचूनही दाखविला होता . राणे यांची आज जी काही ओळख आहे , ती फक्त ठाकरे कुटुंबामुळे आहे , हे राणेंनी लक्षात ठेवले पाहिजे . साहजिकच स्वत : ला ओळख मिळवून देणाऱ्या ठाकरे कुटुंबातीलच सदस्यावर राणेंनी पुराव्याशिवाय केलेली चिखलफेक निषेधार्ह आहे .राणे हे सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्याने त्यांचे म्हणणे ते आपल्या नेत्यांकडे मांडू शकतात . पण , कसलाही पुरावा नसताना एखाद्या चांगल्या व्यक्तीचे असे चारित्र्यहनन करणे चुकीचे आहे . राणे शिवसेनेत होते , तेव्हा त्याच पक्षाच्या नेतृत्वाचा त्यांनी उद्धार केला . नंतर काँग्रेसमध्ये गेल्यावर काँग्रेस पक्ष आणि विलासराव देशमुख , अशोक चव्हाण अशा नेत्यांवर टीका केली . त्यानंतर स्वत:चा पक्ष काढल्यावर पंतप्रधान मोदींवरही टीका केली होती .
आता राणे भाजपमध्ये असून उद्या भाजप सोडायची वेळ आली , तर ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही टीका करतील . राणेंची ही वक्तव्ये त्यांच्या दोन्ही मुलांचे भविष्यात नुकसान करणार हे निश्चित आहे , असेही पारकर यांनी या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.