देवगड , दि. २८ : देवगड तालुक्यामध्ये सरपंच पदाची निवडणूक झाल्यानंतर आता उपसरपंच पदासाठी ३८ ग्रामपंचायतींमधील काही सदस्य मोर्चेबांधणी करीत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यामध्ये झालेल्या ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमधील ८ ग्रामपंचायतींवर बिनविरोध सरपंच निवडून आले आहेत. तर ३० ग्रामपंचायतींवर सरपंचपदाची निवडणूक झाली होती. सरपंच पदाची निवडणूक झाल्यानंतर आता उपसरपंच पदासाठी इच्छुक असलेले सदस्य आपल्या पक्षाच्या वरिष्ठांकडे मनधरणी करून आपल्याला उपसरपंचपद मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामुळे उपसरपंच पदासाठी ३८ ग्रामपंचायतींमधील काही सदस्य मोर्चेबांधणी करीत असल्याचे दिसून येत आहे.
देवगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रथमच सरपंच हे थेट जनतेमधून निवडले गेले आहेत. आता सरपंचपदाची निवडणूक झाल्यानंतर उपसरपंचपद आपल्याकडे राहण्यासाठी ३८ ग्रामपंचायतींमधील इच्छुक सदस्य मोर्चेबांधणी करीत आहेत. विशेष करुन महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायतींमधील उपसरपंच पदासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे.
कुणकवण, उंडील, बुरंबावडे, आरे, तोरसोळे, किंजवडे, मिठमुंबरी, चाफेड, सांडवे, कुवळे-रेंबवली, कोटकामते, खुडी, वाघिवरे-वेळगिवे, गवाणे, गिर्ये, कट्टा, दहिबांव, नारिंग्रे, दाभोळे, पोंभुर्ले, महाळुंगे, नाद, पडेल, पेंढरी, गोवळ, पाटगांव, बापर्डे, मणचे, पोयरे, चांदोशी, सौंदाळे, वाघोटण, फणसे, विजयदुर्ग, साळशी, ओंबळ, हडपीड, हिंदळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत.
यातील मिठमुंबरी, चाफेड, कुवळे-रेंबवली, कोटकामते, खुडी, वाघिवरे-वेळगिवे, दहिबांव, दाभोळे, नाद, पेंढरी, पाटगांव, मणचे, पोयरे, चांदोशी, सौंदाळे, फणसे, ओंबळ, हिंदळे, महाळुंगे, सांडवे या २० ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान झाले आहेत. याच ग्रामपंचायतींवर उपसरपंच पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात निवडणूक झालेल्या ३८ ग्रामपंचायतींमधील काही ग्रामपंचायतीतील सरपंच आरक्षणामुळे सदस्य पदासाठी निवडणूक लढवून निवडून आले आहेत. यामुळे हे विद्यमान सदस्य महिला सरपंच असलेल्या ठिकाणी उपसरपंच पदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
पडेल ग्रामपंचायत राजकीय दृष्टीकोनातून महत्त्वाची ग्रामपंचायत ओळखली जाते. तसेच विजयदुर्ग विभागातील पडेल ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील पडेल कॅन्टींग ही झपाट्याने वाढणारी बाजारपेठ निर्माण झाली आहे. यामुळे पडेल ग्रामपंचायतीला एक वेगळेच महत्त्वाचे व बाजारपेठेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
मिठमुंबरी ग्रामपंचायतीवर स्वाभिमान पक्षाच्या रिमा मुंबरकर सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या असून पर्यटनाच्या दृष्टीकोनातून मिठमुंंबरी ग्रामपंचायतही महत्त्वाची समजली जाते. या ग्रामपंचायतीवर उपसरपंचपद मिळण्यासाठी तेथील काही सदस्य मोर्चेबांधणी करीत आहेत. दयाळ गांवकर व उल्हास गांवकर हे उपसरपंच पदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
पडेल ग्रामपंचायतीत सर्वात जास्त सदस्यदेवगड तालुक्यात झालेल्या ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठी ११ सदस्यांची पडेल ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीवर भाजपाचे विकास दीक्षित हे सरपंच म्हणून विराजमान झाले असून याच महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर उपसरपंचपद मिळण्यासाठी तेथील सदस्य सुभाष घाडी व अविनाश फाळके इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.