रत्नागिरी : एस. एन. डी. टी. विद्यापीठ पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव सातारा येथे झाला. यावेळी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संगणक पदवी महिला महाविद्यालयाने सलग पाचव्या वर्षी थिएटर इव्हेंटचे सर्वसाधारण विजेतेपद मिळविले आहे. या महोत्सवात पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १७ महाविद्यालये सहभागी झाली होती.यात महाविद्यालयाच्या एकूण ४० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. थिएटर इव्हेंटरमधील स्कीट व माईमला प्रथम क्रमांक मिळाला. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक रूईली टाकळे, क्ले मॉडेलिंगमध्ये प्रथम क्रमांक अंकिता विचारे, लोकनृत्य स्पर्धेत व्दितीय क्रमांक महाविद्यालयाने मिळविला. कोलाज स्पर्धेत समिधा सावंत हिने व्दितीय क्रमांक, तर वाद-विवाद स्पर्धेत आरती करंदीकर, राधिका चव्हाण यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तृतीय क्रमांक दर्शना पटेल, कविता वाचन स्पर्धेत तृतीय क्रमांक ग्रिष्मा नार्वेकर, तसेच कार्टुनिंग स्पर्धेत निकिता घुडे हिने तृतीय क्रमांक मिळवले. एकपात्री व पथनाट्य स्पर्धेत महाविद्यालयाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सुगम संगीत व समूह गायन स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला. सर्व विजेत्यांची अंतिम स्पर्धा २० व २१ सप्टेंबर रोजी मुंबई येथील एसएनडीटी विद्यापीठात होणार आहे.विद्यार्थिनींच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. अजिज पठाण, बीसीए स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश सोहोनी, बी. एड. स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश घळसासी, स्थानिक व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अ. ल. जडे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य बबनराव पटवर्धन, मंदार सावंत-देसाई यांनी कौतुक केले आहे. सुजित मेस्त्री, यतीन पवार, मंथन खांडके, मनाजे भिसे, रोशन ठीक तसेच नृत्य दिग्दर्शक निखील पाडावे, गायनासाठी विजय रानडे यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
रत्नागिरी बीसीए महाविद्यालय सलग पाचव्यांदा अजिंक्य
By admin | Published: August 29, 2014 10:15 PM