रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रायगड लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग पूर्णत: सज्ज आहे. या मतदारसंघात ३१ जानेवारी २०१९ पर्यंत १४ लाख ४० हजार ९६६ मतदारसंख्या आहे.
नवीन नोंदणीच्या अर्जांमुळे ही संख्या आणखी काही हजारांनी वाढणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची सर्वांनीच दक्षता घ्यावी, असे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले.रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण १४,४०,९६६ मतदारांमध्ये ७,०५३५० पुरुष व ७,३५,९९७ महिला मतदार व इतर ९ मतदारांचा समावेश आहे. नवीन मतदारांची अधिकृत नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही संख्या आणखी वाढणार आहे. २३ व २४ फेब्रुवारी २०१९ रोजी केलेल्या विशेष मतदार नोंदणीत ४८३१ अर्ज दाखल आहेत.
३१ आॅक्टोबर २०१८ पासून आतापर्यंत १७,६४३ मतदार नोंदणी अर्ज दाखल झाले असून, पडताळणी सुरू आहे. मतदानासाठी ३९३८ बॅलट युनिट, २२८९ कंट्रोल युनिट व २३७५ व्हिव्हीपॅट मशीन उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली.