सिंधुदुर्ग : सोशल मीडियावर सकाळचे गुड मॉर्निंग, शुभ प्रभात मेसेजच्या ठिकाणी आता कोण येणार निवडून, आपला अंदाज काय ? अशा मेसेजव्दारे निवडणूक निकालाचा कल अनेकांकडून घेण्यात येताना दिसून येत आहे. यामध्ये मतदार, मित्रमंडळी आपापले मत व्यक्त करताना दिसून येत आहेत. कोणी कमळ तर कोणी मशाल असे मत व्यक्त करीत असल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात नेमका कोणाचा विजय होईल, याबाबत अंदाज बांधले जात आहेत.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात मंगळवार ७ मे रोजी शांततेत पार पडली. यात ९ उमेदवारांचे भाग्य ‘इव्हीएम’मध्ये बंद झाले आहेत. ४ जून रोजी निकाल लागणार आहे. तत्पूर्वी फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडियावर काही जण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोणाचा विजय होणार ? मत नोंदवा असा मेसेज टाकत आहेत.या मेसेजला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेक मतदार आपला कल त्यावर सांगत आहेत. तर काही राजकीय व्यक्ती आपला उमेदवारच निवडून येण्याचाही दावा येथे करताना दिसून येत आहेत. या निवडणुकीच्या निकालावर विधानसभेचे बरेच समीकरण अवलंबून आहे. त्यामुळे आमदारांना सुद्धा लोकसभेच्या निकालाची चिंता लागली आहे.
राजकीय पक्षांचे पदाधिकारी करताहेत दावे
- सोशल मीडियावर काही जणांनी टाकण्यात आलेल्या मेसेजल काही राजकारणी कार्यकर्ते मत नोंदविण्याऐवजी आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा करीत आहेत.
- यामध्ये तर काही असेही आहेत की ज्यांच्या उमेदवारांचा कुठेच थांगपत्ता नाही तेसुद्धा आमचाच उमेदवार निवडून येणार असल्याचे ठासून सांगत आहेत. यामुळे यातून काहींचे मनोरंजनसुद्धा होत आहे.
कोणीही निवडून आले तरी पळसाला पाने तीनच
- सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या मेसेजवर काही जण ‘कोणीही आले तरी पळसाला पाने तीनच’ अशीसुद्धा प्रतिक्रिया देऊन आपले मत नोंदविता दिसून येत आहेत.
- निवडणूक निकालाच्या अनुषंगाने सट्टा बाजारातही मोठी उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा सट्टा लावण्यात येत असल्याचे चित्र आहे.
- लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार असल्याने सर्वांचे लक्ष ४ जूनकडे लागलेले दिसून येत आहे.