रत्नागिरी : पर्ससीन मासेमारीवरील शासनाने लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीसाठी उद्या, शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंंधुदुर्गमधील छोटे-मोठे पर्ससीन मच्छिमार या मोर्चात सहभागी होणार आहेत.रत्नागिरी मिरकरवाडा मच्छिमार सोसायटीमध्ये या संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मोर्चा काढण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा पर्ससीन मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष अब्दुल लतीफ मालदार यांनी दिली. या बैठकीला रत्नागिरी जिल्हा पर्ससीन मच्छिमार संघटनेचे उपाध्यक्ष सुलेमान मुल्ला, नगरसेवक नुरू पटेल, शरीफ दर्वे, छोटू दर्वे, विकास सावंत, जितेंद्र अनंत शेटे, मझर मुकादम, इम्तिहाज हाफिसा होडेकर, इम्तियाज मुकादम, मोंडकर यांच्यासह पर्ससीन मच्छिमार उपस्थित होते.शासनाने १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंतच पर्ससीन मच्छिमारांना मासेमारी करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर मात्र संपूर्णच मासेमारी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या विरोधात हा मोर्चा काढला जाणार आहे. ही बंदी घालताना शासनाने पर्ससीन मच्छिमारांची बाजू समजून घेतलेली नाही. बंदीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होणार असल्याची माहिती नासीर वाघू यांनी दिली. पर्ससीनवरील बंदीमुळे बर्फ व्यवसायावरही परिणाम होणार आहे. एप्रिल आणि मे महिना हा खरा तर मासेमारीचा मुख्य हंगाम आहे. याच काळात निर्यातीच्या दर्जाचे मासे खोल समुद्रात मिळतात. मात्र, हंगामाच्या काळातच शासनाने बंदी घातल्यामुळे पर्ससीन मासेमारी अडचणीत आली आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरीत उद्या पर्ससीन मच्छिमारांचा मोर्चा
By admin | Published: February 18, 2016 11:24 PM