प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीसंगमेश्वर तालुक्यातील कसबा गटातून विजयी झालेल्या सेनेच्या रचना महाडिक यांना पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष बनविण्याच्या जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या महत्त्वाकांक्षेपुढे रत्नागिरी तालुक्याने आव्हान निर्माण केले आहे. या पदासाठी संगमेश्वर विरुद्ध रत्नागिरी असा सामना रंगणार असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत. त्यात कोण बाजी मारणार? याबाबत जिल्हावासियांत उत्कंठा निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीत ५५ पैकी तब्बल ३९ जागांवर विजय मिळवित शिवेसेनेने एकहाती सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवादीला १५, तर कॉँग्रेसला एक जागा मिळाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाले आहे. या पदासाठी सेनेत जोरदार चुरस आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व १० जागा जिंकणाऱ्या रत्नागिरी तालुक्यालाच अध्यक्षपद हवे, यासाठी भूमिका पुढे येऊ लागली आहे. रत्नागिरीला अध्यक्षपद मिळाल्यास देवयानी झापडेकर यांच्या नावाचा विचार प्राधान्याने होईल, अशी चर्चा आहे.या पदासाठी शिवसेनेच्या गोटात आधीपासूनच रचना महाडिक यांच्या नावाची चर्चा आहे. त्यातच त्यांनी शिवसेनेतील बंडखोर राजेश मुकादम यांना पराभूत केले असल्याने त्यांच्या विजयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, आता रत्नागिरीचे नावही चर्चेत आल्यामुळे अध्यक्षपदाची चुरस निर्माण झाली आहे.रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यात सेनेला ३० ते ३२ जागा मिळण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात रत्नागिरीत १०, संगमेश्वर ७, मंडणगड १, दापोली ३, खेड ४, गुहागर १, लांजा ४, चिपळूण ५, तर राजापूर ४, अशा ३९ जागांवर सेनेला जिल्ह्यात विजय मिळाला. निवडणुकीचा निकाल येण्याआधीपासूनच रचना महाडिक यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. संगमेश्वर तालुक्यातही सेनेने जिल्हा परिषदेच्या सर्व सात जागांवर विजय मिळविला आहे. (प्रतिनिधी)रचना महाडिक की देवयानी झापडेकर?जि. प.चे अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. रत्नागिरीसह तालुक्यात शिवसेनेच्या देवयानी झापडेकर, साधना साळवी, स्नेहा सावंत, मानसी साळवी, आरती तोडणकर, ऋतुजा जाधव या विजयी सदस्य आहेत. संगमेश्वरमध्ये रचना महाडिक, मुग्धा जागुष्टे, रजनी चिंगळे, लांजामध्ये पूजा नामे, स्वरूपा साळवी, पूजा आंबोळकर, राजापूरमधील सोनम बावकर, दापोलीतील रेश्मा झगडे, चारुता कामतेकर व खेडमधील स्वप्नाली पाटणे हे सेनेतील या पदासाठीचे चेहरे आहेत. महाडिक व झापडेकर यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस लागण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी विरुद्ध संगमेश्वर सामना!
By admin | Published: February 24, 2017 11:37 PM