रत्नागिरी : दुर्गेश आखाडे लिखित ‘अधिक अधिक वजा’ हे बालनाट्य व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे. व्यावसायिक रंगभूमीवरील पहिला प्रयोग दि. २२ फेब्रुवारी रोजी विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी येथे आयोजित करण्यात आला आहे.‘अधिक अधिक वजा’ हे बालनाट्य यापूर्वी रत्नागिरीतील गुरुवर्य अ. आ. देसाई विद्यामंदिर हातखंबा, रा. भा. शिर्के प्रशाला रत्नागिरी आणि आदर्श विद्यामंदिर, वाटूळ या संस्थांनी राज्य शासनाच्या राज्य बालनाट्य स्पर्धेत्र सादर केले होते. कल्याण येथे झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत्र अभिनयाचे पारितोषिकही या नाटकाला मिळाले होते. ‘अधिक अधिक वजा’ हे बालनाट्य रत्नागिरीमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात सादर करण्यात आले. त्यावेळी नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर मार्च २०१४मध्ये अधिक अधिक वजा बालनाट्य पुस्तकाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. त्यानंतर या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही प्रसिद्ध झाली. अक्षरगुरू या संस्थेने ‘अधिक अधिक वजा’ हे बालनाट्य व्यावसायिक रंगभूमीवर आणले आहे.दि. २२ फेब्रुवारी २०१५ला सकाळी ११. ३० वाजता विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी येथे या बालनाट्याच्या शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. या नाटकाची निर्मित्री आणि दिग्दर्शन पूनम सावंत यांनी केले आहे. या नाटकात केदार सुपारकर, दिग्विजय सावंत, हितार्थ पाटील, सानिका पोवळे, ओंकार कुळवडे, उज्वला पोवळे, चिरायु मांजरेकर, सिद्धेश मांजरेकर, हृषिकेश कामतेकर, अभिषेक कदम, सर्वेश म्हात्रे, रंजना देशपांडे, ज्ञानेश्वर काशिद हे बालकलाकार महत्त्वाच्या भूमिका सादर करणार आहेत. उन्हाळी सुट्टीमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात या बालनाट्याचे प्रयोग मुंबई आणि पुणे शहरात सादर करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
रत्नागिरीचे बालनाट्य व्यावसायिक रंगभूमीवर
By admin | Published: February 18, 2015 10:25 PM