रत्नागिरी : शॉटगन डबल ट्रॅप या नेमबाजी स्पर्धेत रत्नागिरीच्या दोन खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपल नाव कोरलंय. नुकत्याच जयपूर येथे झालेल्या २५व्या आॅल इंडिया जी. व्ही. मावळणकर शॉटगन शूटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेतील डबल टॅ्रप या नेमबाजी प्रकारात रत्नागिरीतील चार खेळाडंूची निवड झाली होती. यापैकी मानस हेमंत कीर आणि विक्रांत रमाकांत देसाई हे दोघे आता राष्ट्रीय स्पर्धा खेळणार आहेत. मानस कीर याने या स्पर्धेत ६० पैकी ३९ गुणांची कमाई करत कांस्य पदकावर नाव कोरले. विक्रांत देसाई याने ६०पैकी ३१ गुणांची कमाई करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपल नाव निश्चित केलं आहे. याच स्पर्धेत विशाल देसाई यांनी ६०पैकी २४ गुण मिळवले. मात्र, ६ गुणांनी त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठीची निवड हुकली. डिसेंबरमध्ये जयपूर येथे होणाऱ्या २५व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मानस कीर आणि विक्रांत देसाई हे दोन खेळाडू महाराष्ट्राकडून खेळतील. रत्नागिरीसारख्या शहरात जिथे डबल ट्रप या नेमबाजी प्रकारासाठी आवश्यक कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत, अशा स्थितीत या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे. रत्नागिरीतील खेळाडूंना राष्ट्रीयस्तरावर खेळताना अडचणींना सामोरे जावे लागले. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संजय शिंंदे यांचे त्यांना सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
रत्नागिरीचे दोघे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर
By admin | Published: October 25, 2015 10:56 PM