कुडाळ : विद्यांचल सिक्युरिटी सर्व्हिस व त्यांच्याकडील सुरक्षा रक्षक विनानोंदीत ठरत असल्याने अखेर सतरा नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांनाच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शुक्रवारपासून सेवेत सामावून घेतले आहे. या नोंदणीकृत सुरक्षारक्षकांना सेवेत सामावून घेण्यासाठी संदेश पारकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गेले पाच ते सहा दिवस सुरू असलेला हा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मागणीनुसार रत्नागिरी व सिंधुदुर्ग सुरक्षा रक्षक मंडळामार्फत सिंधुदुर्ग जिल्हा सुरक्षा रक्षक संघटनेच्या १७ सुरक्षारक्षकांना सेवेत रु जू होण्याबाबत आदेश काढण्यात आले होते. यानंतर विद्यांचल सिक्युरिटी सर्व्हिसमार्फत पूर्वीपासून सेवेत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी कुडाळ एमआयडीसी येथे उपोषण सुरू केले होते. उपोषणानंतर शासनाला धोरणानुसार नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांना सेवेत रुजू करण्याच्या मागणीसाठी सिंधुदुर्ग सुरक्षा रक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ एमआयडीसी येथे सोमवारी एमआयडीसीच्या कार्यालयात धडक दिली होती. याबाबत येत्या चार दिवसात निर्णय न झाल्यास ५ डिसेंबरपासून बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिला होता. यानंतर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता अविनाश रेवंडकर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत संदेश पारकर उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत पारकर यांनी, जोपर्यंत या नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांना सेवेत सामावून घेतले जात नाही, तोपर्यंत मी येथून हलणार नाही, असा इशारा दिला होता. यावेळी एमआयडीसीचे अधिकारी रेवंडकर यांनी रत्नागिरी एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता पी. टी. करावडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांनाच शुक्रवार दुपारपासून सेवेत सामावून घेण्याचा निर्णय दिला. विद्यांचल सिक्युरिटी सर्व्हिसच्या सुरक्षा रक्षकांनी सुरक्षा रक्षक म्हणून नोंदणीसाठी कोणताही अर्ज सादर केलेला नाही. त्यामुळे ते कंत्राटदार व विनानोंदीत ठरतात, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांच्या भूमिकेला पारकर यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांनाच सेवेत सामावून घेण्यात आले आहे. यावेळी संदेश पारकर, रुपेश पावसकर, लॉरेन्स मान्येकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सतरा सुरक्षारक्षकांना पुन्हा नियुक्ती
By admin | Published: December 05, 2014 10:37 PM