सावंतवाडी : संस्कारक्षम पुस्तकांच्या वाचनामुळे आपले व्यक्तिमत्त्व विकसित होते. त्याचप्रमाणे वाचनामुळे आपली मने संवेदनशील व भावनाशील बनतात. याकरिता विद्यार्थीदशेतच अधिक वाचन करा, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष भरत गावडे यांनी केले.
धवडकी शाळा नं. २ या शाळेत कोमसाप शाखा सावतंवाडी व प्रशालेच्यावतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना गावडे बोलत हाते. यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व कार्यक्रमाध्यक्ष महेश सौंदेकर, मुख्याध्यापिका भावना गावडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी भरत गावडे यांनी मानवी जीवनात वाचनाला महत्त्वाचे स्थान आहे. सतत वाचन करणारा माणूस आनंदी व चांगले जीवन जगतो. मनोरंजनाप्रमाणेच वाचनातून व्यक्तिमत्त्व विकसित होतो, असे सांगितले.
मुख्याध्यापिका भावना गावडे यांनी शैक्षणिक वर्षात वाचनाबाबत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. भरत गावडे यांनी कथा, कविता, वृत्तपत्र, कादंबरी, नाटक, नाट्यउतारा आदींचे वाचन कसे करावे याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. मुलांनी उत्कृ ष्ट वाचन केले.
दाणोली केंद्रात घेण्यात आलेल्या प्रकट वाचन स्पर्धेत स्नेहा म्हाडेश्वर हिने प्रथम क्रमांक मिळविला. तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिवाळीच्या सुटीत २० ते ३० मिनिटे वाचन करण्याची प्रतिज्ञा मुलांनी घेतली. संगीता पास्ते यांनी आभार मानले.