माणगाव : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणादिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यातून ज्ञानसंपन्न व माहितीसमृद्ध समाज घडावा, हा उद्देश आहे. अशाप्रकारचा स्तुत्य उपक्रम श्री वासुदेवानंद वाचनालयात साजरा करण्यात येतो ही कौतुकाची बाब आहे, असे प्रतिपादन वाचनालयाच्या संचालिका स्नेहल फणसळकर यांनी केले.
माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी फणसळकर यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष विजय पालकर, संचालक मेघ:शाम पावसकर, मनोहर खामकर, सदाशिव पाटील आदी उपस्थित होते.
स्नेहल फणसळकर म्हणाल्या, डॉ. कलाम यांचे संपूर्ण जीवन हे युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारताच्या सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. डॉ. कलाम यांच्या जीवनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विजय पालकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव एकनाथ केसरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कर्मचारी तसेच वाचक उपस्थित होते. यानिमित्त वाचनालयातर्फे आयोजित ग्रंथप्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.