रेडी : औद्योगिकरण करताना पर्यावरणाचे रक्षण व स्थानिकांना विश्वासात घेऊन पर्यटनात्मक विकास केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रेडी येथे केले. रेडी ग्रामपंचायतीने ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल आयोजित अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. रेडी ग्रामपंचायतीस ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून रेडी ग्रामपंचायतीने स्थापनेपासून आतापर्यंत ज्यांनी सरपंच, उपसरपंच तसेच उपसरपंच पद भूषविले व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रेडी गावच्या विकासासाठी ज्यांनी बहुमोल योगदान दिले, अशा सर्वांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पालकमंत्री दीपक केसरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर, दत्तगुरू वझे, एस. फ्रान्सिस, सरपंच सुरेखा कांबळी, दीपक राणे, डॉ. विवेक रेडकर, प्रल्हाद इंगळे, अजित सावंत, अश्विनी सातोसकर, राजन गावडे, प्रकाश परब, परशुराम राऊत, गौरेश कांबळी, चक्रपाणी गवंडी, ज्योती गोसावी, नंदिनी मांजरेकर, स्वप्नील नाईक, श्रध्दा राणे, राजेंद्र राणे, श्रृतिका साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी केसरकर म्हणाले, रेडी बंदर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बंदर करण्याचा आपला मानस असून रेडी येथील यशवंतगड किल्ल्याची झालेली पडझडीचीही दुरूस्ती करण्यात येईल. हा किल्ला आंतरराष्ट्रीय नकाशावर येण्यासाठी येथील जमीनदारांनी जमीन देऊन सहकार्य केल्यास किल्ला दुरूस्तीसाठी कोकण पर्यटन निधीतून १० कोटी रूपये निधी उपलब्ध होईल. सांस्कृतिक सभागृहासाठी २० लाख, नळपाणी साठवण टाकीसाठी पाच लाखांचा निधी देण्याचेही आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. मासेमारी, प्रदूषणविरहीत उद्योगधंदे, पेट्रोलियम प्रकल्प, काथ्या व्यवसाय हे उद्योग लोकांना विश्वासात घेऊन भविष्यात आणले जातील, असेही केसरकरांनी आश्वासन दिले.दरम्यान, खासदार विनायक राऊत यांनी भेट देऊन रेडी हायस्कूल इमारतीसाठी खासदार निधीतून १० लाख रूपये मंजूर केल्याची माहिती दिली. यावेळी राजन तेली, संदेश पारकर, दत्तगुरू वझे, डॉ. विवेक रेडकर, अजित सावंत, सचिन राणे, प. म. राऊत, सुरेखा कांबळी, रावजी राणे, राजेंद्र कांबळी, लवराज कांबळी, गीतांजली कांबळी यांनी मनोगत व्यक्त करून अमृत महोत्सवास शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक सुरेखा कांबळी, सूत्रसंचालन नागेश नेमळेकर, आभार राजेंद्र कांबळे यांनी मानले. (वार्ताहर)
रेडीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2016 10:25 PM