सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीमध्येही बंडखोरी झाली. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदेसेनेकडून मंत्री दीपक केसरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.दरम्यान सावंतवाडीतील जनरल जगन्नाथ भोसले उद्यान येथे परब यांनी मेळावा घेत आपले विचार मांडले. यात प्रामुख्याने त्यांनी मी कुणावरही टीका करणार नाही ज्यांनी ज्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली त्यांना देव चांगली बुद्धी देवो अशी प्रार्थना केली. मला सर्वसामान्य मतदाराचा विशाल बनायचे आहे. मला साहेब बनायचे नाही असे सांगत रोजगाराचा मुद्दा या मतदारसंघात मोठा आहे ज्या दिवशी हा मुद्दा मी सोडवेन त्याच वेळी मला खऱ्या अर्थाने धन्य झाल्यासारखे वाटेल. विकास काय असतो ते तुम्हा मतदारांना दाखवून द्याचे आहे, त्यामुळेच तुम्ही पाठीशी राहा असे आवाहनही परब यांनी यावेळी केले.वरिष्ठांकडून अर्ज न भरण्याचे आवाहन, पण..मला भाजपच्या वरिष्ठांकडून उमेदवारी अर्ज न भरण्याचे आवाहन करण्यात आले. पण या सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातील अश्रू मला विकासाच्या माध्यमातून पुसायचे आहेत म्हणूनच मी हा उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे परब यांनी सांगितले. भव्य रॅली काढून निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
कोकणात महायुतीत बिघाडी; बंडखोरी करत भाजपच्या विशाल परबांनी सावंतवाडीतून भरला उमेदवारी अर्ज
By अनंत खं.जाधव | Published: October 28, 2024 1:58 PM