कणकवली : एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाच्या नोकर भरतीत स्थानिकांना डावलून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. या नोकर भरतीत मोठा घोटाळा झाला असून, किंबहुना हा घोटाळा करण्यासाठी एसटी महामंडळाने एजन्सीमार्फत भरती केल्याचा आरोप करून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शिष्टमंडळाने एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांना धारेवर धरले.भरती झालेल्यांना सुरू असलेले प्रशिक्षण दोन दिवसांत थांबविण्यात यावे, नाहीतर जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना हुसकावून लावण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिष्टमंडळाने यावेळी दिला. माजी उपसभापती संतोष कानडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांची भेट घेतली. तसेच नोकर भरतीत स्थानिकावरील अन्यायाचा जाब विचारला. यावेळी सहाय्यक यंत्र अभियंता ए. एस. मांगलेकर उपस्थित होते.नोकर भरतीत ६० टक्के स्थानिक उमेदवारांची निवड केल्याचे हसबनीस यांनी सांगताच १०० टक्के स्थानिकांना संधी का नाही देण्यात आली ? यावर हसबनीस यांनी शासनाच्या धोरणाप्रमाणे नोकर भरती झाली. यामध्ये आपला काही रोल नाही. असे सांगताच ज्यांचा रोल आहे त्यांना आमच्यापुढे उभे करा. त्यांनी निकषावर स्थानिकांना डावलले? या भरतीवर शासनाचे काय नियंत्रण आहे? घोटाळा करण्यासाठीच एजन्सीमार्फत भरती केली का? असा प्रश्नांचा भडिमार शिष्टमंडळाने केला.प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना प्राधान्य न दिल्याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली असता त्यांनी सिंधुदुर्ग विभागाने प्रतीक्षा यादी कळविली नसल्याचे सांगतिले. याकडे कानडे यांनी लक्ष वेधले असता हसबनीस यांनी प्रतीक्षा यादीची कालमर्यादा संपल्याने त्यांची भरती करता येणार नसल्याचे सांगितले. खुल्या प्रवर्गातील जागांवर आरक्षीत उमेदवारांची भरती केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.मुंबईच्या यू. एस. टेक्नॉलॉजी एजन्सीमार्फत सिंधुदुर्ग विभागात ३२५ उमेदवारांची भरती झाली असून, त्यांचे कुडाळ, कणकवली, देवगड व मालवण आगारात प्रशिक्षण सुरू झाल्याची माहिती एका प्रश्नाला उत्तर देताना हसबनीस यांनी दिली. स्थानिकांवरील अन्यायाबाबत आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधणार असून दोन दिवसांत हे प्रशिक्षण थांबविण्यात यावे नाही तर कायदा हातात घेऊ, असा इशारा यावेळी दिला. या शिष्टमंडळात पंचायत समिती सदस्य मनोज राणे, मिलिंद मेस्त्री, महेंद्र डिचवलकर, सरपंच संदीप सावंत, कोळोशी सरपंच सुशील इंदप, संजय रावले अन्यायग्रस्त उमेदवार प्रफुल्ल तोरसकर आदींचा समावेश होता.
एसटी भरतीवरून विभाग नियंत्रकांना धरले धारेवर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 8:50 PM