सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सेवानिवृत्त शिक्षकांना सामावून घेण्याबाबत काढण्यात आलेला तो अध्यादेश फक्त १ महिन्यापुरताच आहे. आता उच्च न्यायालयाचा निर्णय सरकारच्या बाजूने लागला असून, लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जलसमाधी आंदोलनासारखी टोकाची भूमिका उमेदवारांनी घेऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री केसरकर म्हणाले, संबंधित मागणी करणारे उमेदवार हे टीईटी परीक्षा पास नसल्यामुळे हा प्रश्न रेंगाळला आहे. त्यामुळे भविष्यात त्यात काही बदल करून सकारात्मक भूमिका घेता येऊ शकते का, याबाबतही आमचा विचार सुरू आहे.राज्यात ५० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती होणार आहे. पहिल्या टप्प्यात ३० हजार पदांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिक्षक नाही, हा प्रश्न सुटणार आहे.दुसरीकडे निवृत्त शिक्षक नेमण्यात आल्यामुळे या ठिकाणी टीका केली जात आहे. परंतु, ही नेमणूक एका महिन्यासाठी आहे. त्या ठिकाणी नवोदित उमेदवार घ्यायचे झाल्यास त्यांची निवड, प्रशिक्षण आदी गोष्टींसाठी वेळ झाला आहे. या प्रक्रियेला बराच कालावधी लागणार असल्यामुळे आम्ही निवृत्त शिक्षकांना घेण्याचा निर्णय घेतला, असेही केसरकर म्हणाले.
सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक एका महिन्यासाठीच, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 12:21 PM