सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखेर मान्सून सक्रिय झाला असून शनिवारी सकाळपासून दमदार पावसाने बरसायला सुरूवात केल्याने बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत होत्या. आता शेतीच्या कामांनी वेग घेतला असून पाणीटंचाईचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात ४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक १०२ मिलीमीटर पाऊस वैभववाडी तालुक्यात झाला आहे. हवामान विभागाने रविवार ९ जून रोजी रेड अलर्ट दिला असून संततधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.मान्सून सिंधुदुर्गच्या वेशीवर गोव्यात दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते. त्यातच गुरूवार ६ जूनपासून मान्सून महाराष्ट्रात सक्रीय होईल, असेही जाहीर केले होते. गुरूवारी केवळ किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये अधूनमधून पाऊस कोसळत होता. तर शुक्रवारी जिल्ह्याच्या काही भागात अगदी दबक्या आवाजात मान्सून दाखल झाला होता. शनिवारी मात्र जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने दमदार सलामी दिली.
पावसाळी वातावरण कायमजिल्ह्यात मागील चार दिवसात ढगाळ वातावरण होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती होती. परंतु त्यानंतर कडक ऊनही पडले होते. शुक्रवारी सायंकाळी पावसाच्या सरी कोसळायला सुरूवात झाली. जिल्ह्याच्या अनेक भागात शुक्रवारी रात्री दमदार पाऊस झाला. तर शनिवारी दिवसभर अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत होत्या. सायंकाळनंतर पाऊस थांबला असला तरी पावसाळी वातावरण कायम होते.